नांदेड (प्रतिनिधी) : चर्मकार, मागासवर्गीय व बहुजन समाजाला आंबेडकरवादा पासून दूर नेण्याचे व गुमराह करण्याचे कट कारस्थान सध्या देशात मोठ्या प्रमाणात चालू असून हे षडयंत्र हाणून पाडण्याचे काम आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
समता परिषदेच्या नांदेड शहर शाखेतर्फे विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त उल्हासनगर नांदेड येथे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले, यावेळी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण वाघमारे, भीमराव वाघमारे, महानगर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे, मंगल दुधंबे यांनीही मार्गदर्शन केले.
आपल्या प्रबोधनात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, उत्तर भारतातील चर्मकार व बहुजन समाजाने आंबेडकरवादाचा मनापासून स्वीकार केला असल्याने त्यांची सर्व क्षेत्रात लक्षणीय प्रगती होत आहे, हे पाहवत नसल्याने देशभरातील चर्मकार समाजाला आंबेडकरवादापासून दूर नेण्याचे काम चर्मकार समाजातीलच कांही सनातनी विचारांचे लोक करीत आहेत. त्यात रविदासिया धर्म संघटन सध्या आघाडीवर आहे. या माध्यमातून हरि हरि करायला लाऊन आधुनिक हरिजन तयार केले जात आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश वाघमारे यांनी केले तर सौ. मनिषा कांबळे यांनी आभार मानले. यावेळी सौ. विद्या उकंडे, सौ. कलावती कांबळे, सौ. वेणूताई वाघमारे, संभाजी काबळे, नारायण अन्नपुरे, दादाराव वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.