जिल्ह्यात पशुगणना सुरु ;नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे सहकार्य करावे

नांदेड  :- केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक 21 वी पशुगणना 25 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होत आहे. नांदेड जिल्ह्यात या कामासाठी 308 प्रगणक व 79 पर्यवेक्षक यांची नियुक्ती पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आलेली आहे. या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन, पशुधनाची माहिती घेणार आहेत. प्रत्येक गाव व शहरातील प्रगणक नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा करणार आहेत. तरी नागरिकांनी या गणनेत सहभागी होऊन योग्य माहिती प्रगणकास देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.

ग्रामीण भागात प्रमुख कृषीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनास संबोधले जाते. पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. दूध, अंडी, लोकर आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीवीकेलाही चालना मिळते. पशुपालन क्षेत्राचा शाश्वत विकास घडविण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून पशुपालकांना प्रोत्साहन देते. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाद्वारे पशुपालन वाढविण्यावर शासनाचा भर आहे.

या पशुधनाच्या माहितीमध्ये कुटूंबामध्ये असलेल्या गाय, म्हैस, शेळी व मेंढी, वराह, घोडे व गाढव, कुक्कुट पक्षी इत्यादीच्या संख्येची नोंद मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे.  पशुसंवर्धन विभागातील योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या पशूंची नोंद होणे आवश्यक आहे. पशुगणनेमध्ये पशुधन संख्येसोबतच पशुधनाच्या प्रजाती, लिंग, वय इत्यादी बाबीची नोंद करण्यात येणार आहे. यापूर्वीची पशुगणना टॅब द्वारे करण्यात आली होती. आताची मोबाईल ॲपद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र ॲपची निर्मिती केलेली आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत असलेल्या पशुगणनेमुळे पशुपालकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे, दुधाचे अनुदान, पशुरोग प्रतिबंधक लसीकरण, वैरण बियाणे, पशुखाद्य, पशू औषधी, मुरघास, खनिज मिश्रण, पशुधन विमा इत्यादी योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. पशुगणनेत प्रगणकांना स्वत:च्या मोबाईल ॲप वापरुन माहिती संकलित करावी लागणार आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, उंट, घोडा, गाढव, मिथून अशा 15 प्रजातींची माहिती जमा केली जाणार आहे. तसेच 219 स्वदेशी जातींची नोंद केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!