नांदेड,(प्रतिनिधी)-आज मतदानाचे साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी सहा वाजता बोलावलेल्या लोकांना दीड वाजेपर्यंत जेवण भेटले नाही. जेवणातील वाढपी हसत खिदळत व्हिडिओ करणाऱ्यांना बघत होते. वातानुकूलित कक्षात बसून सर्वकाही परिपूर्ण आहे. असे सांगणारे अधिकारी मात्र निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या आणि सर्वात शेवटच्या कर्मचाऱ्यांच त्रास पाहण्यासाठी हजर दिसले नाहीत. कर्मचाऱ्यांना भाकरीचा तुकडा मिळाला नाही तर वातानुकूलित कक्षात कक्षात पंच पक्वान्न कंत्राटदाराने उपलब्ध उपलब्ध करून दिल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
आज मतदान पूर्ण करून घेण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणाऱ्या मंडळींना नांदेड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सकाळी सहा वाजता बोलवले होते. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, त्यांचे 4 सहकारी आणि एक पोलीस कर्मचारी असा प्रत्येक मतदान केंद्रावरील कर्मचारी ताफा असतो. या कर्मचाऱ्यांना तेथे बोलावून न्याहारी, जेवण दिल्यावर मतदानाचे साहित्य देऊन आज सूर्यास्त होण्यापूर्वी मतदान केंद्रावर पोहोचवणे आवश्यक असते.त्यामुळे ही घाई गडबड दर निवडणुकीत दिसतच असते. मतदान केंद्रावर आलेले कर्मचारी नांदेड शहरातील असतीलच असे नाही तर ते बाहेर गावातून सुद्धा आले आहेत. त्यांना मतदान केंद्रावरचे साहित्य ताब्यात देण्यात आले आहे. भूक लागली आहे तर मतदान साहित्य घेऊन जेवणासाठी हॉटेलमध्ये जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत दुपारी दीड वाजेची परिस्थिती अशी आहे की, या ठिकाणी जेवणाचे एक पदार्थ उपलब्ध नाही. सर्व साहित्य संपलेले आहे. मतदानातील कर्मचारी याबद्दल विचारणा करत आहेत तर तेथे हजर असलेली वाढपी मंडळी व्हिडिओ करणाऱ्या कडे पाहून थट्टेने हसत होती. आम्हाला काही माहीत नाही एवढे एकच उत्तर देत होते. वातानुकूलित कक्षात बसून निवडणुकीची तयारी अत्यंत मेहनतीने आम्ही पूर्ण केली आहे असे म्हणणारे कोणतेही अधिकारी या ठिकाणी हजर नव्हते. याच जेवणामध्ये कंत्राटदाराकडे अधिकाऱ्यांच्या जेवणाची सुद्धा सोय असते.त्यांना मात्र जेवणाच्या कंत्राटदाराने पंच पक्कवानांची सोय करून दिली आणि त्यांनी वातानुकूलित कक्षात बसून येथेच ताव मारल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.
हा आजचाच प्रश्न नाही तर उद्याचा यापेक्षा मोठा प्रश्न आहे. कारण मतदान केंद्र हे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तेथून तर मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना क्षणासाठी सुद्धा जागा सोडता येत नाही. नांदेड जिल्ह्यात 3000 पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत आणि त्या मतदान केंद्रांवर सकाळी न्याहारी, जेवण, चहा आणि रात्री उशीर होणार असेल तर ते त्यावेळे साठीचे जेवण अशी सोय करण्याची जबाबदारी कोणाला दिली आहे? आणि तो कशा पद्धतीने ती जबाबदारी पार पाडत आहेत यावर देखरेख करण्यासाठी मात्र कोणीही व्यक्ती शासकीय तंत्रनिकेतन भागात दिसला नाही. आम्ही पाहिलेला घटनाक्रम शासकीय तंत्रनिकेतनचा आहे हा प्रक्रिया जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरु आहे. नांदेड मधील मतदान करवून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची झालेली वाताहत तर आम्ही पाहिली तरी आहे इतर ठिकाणी काय होत आहे देवच जाणे.