नांदेड(प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत एका व्यक्तीची 85 हजारांची सोन्याची चैन लुटून पळालेल्या तिघांना नांदेड पोलीसांनी पाठलाग करून नायगाव हद्दीत पकडले आणि एक मोदी सभा मैदानातच सापडला होता. स्थानिक गुन्हा शाखेने ही कार्यवाही केली आहे. न्यायालयाने या चार जणांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
विठ्ठल अर्जुन गायकवाड रा.कोळगाव (बु) ता.भोकर जि.नांदेड हे 9 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी नांदेडला आले होते. सभासंपल्यानंतर परत जात असतांना त्यांच्या गळ्यातील 85 हजार रुपये किंमतीची चैन एका व्यक्तीने ओढून तोडली आणि ती चैन एका चार चाकीत बसलेल्या लोकांकडे दिली. परंतू अर्जुन गायकवाडच्या साथीदारांनी त्याला पकडले. त्याने सांगितले की, ती चार चाकी गाडी तेलंगणा राज्यातून नांदेडला आली होती आणि ती नायगाव रस्त्याकडे गेली आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी संपुर्ण जिल्ह्याची यंत्रणा जागी केली आणि स्थानिक गुन्हा शाखेला त्या गाडीचा पाठलाग करण्यास सांगितले. ती चार चाकी गाडी क्रमांक ए.पी.15 ए.वाय. 1313 ही गाडी नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेने पकडली. नांदेडमध्ये पकडलेला एक आणि गाडीमधील 3 हे हैद्राबाद येथून नांदेडला मोदी सभेत पॉकिटमारी, चैन स्नेचिंग करण्यासाठीच आले होते. त्यांची नावे अंबर भगवान कसबे (35), पवन कन्हैया उपाद्ये(26), मंगल अभिमन्यु उपाद्ये (26), बालाजी पुंडलिकराव बिरादार (29) अशी आहेत. त्यांनी विठ्ठल गायकवाड यांची लुटलेली 85 हजार रुपयांची चैन आणि त्यांनी तेलंगणातून आणलेली पाच लाख रुपये किंंमतीची चार चाकी गाडी असा एकूण 5 लाख 85 हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी विठ्ठल गायकवाडच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1040/2024 भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) आणि 3(5) नुसार दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या चार चोरट्यांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, नायगावचे पोलीस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल घोगरे, नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, किशन मुळे, विश्वनाथ पवार, सुधाकर देवकत्ते, माधव माने, बाबु चलकुलवार, साईनाथ सांगवीकर, राजेंद्र सिटीकर आणि व्यंकटेश सांगळे यांचे कौतुक केले आहे.