डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या बहारदार निवेदनाने ‘लक्षदिप हे’ या दिवाळी पहाटच्या पहिल्या कार्यक्रमाने रंगत आणली

नांदेड (प्रतिनिधी)-प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांचे दर्जेदार व प्रभावी निवेदन तसेच प्रख्यात गायिका अनुजा वर्तक, सई जोशी आणि नितांशू सावंत या दिग्गज गायकांनी गाजवला दिवाळी पहाटचा पहिला दिवस.  ‘लक्षदिप हे’ या कार्यक्रमात दिग्गज कलावंतांनी सादर केलेल्या मराठी रचनांना भल्या पहाटे अभूतपूर्व गर्दी केलेल्या नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हा प्रशासन, महापालिका, गुरुव्दारा बोर्ड तसेच नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तपपूर्ती झाल्यानंतर आज १३ वा दिवाळी पहाट बंदाघाटवर मोठ्या उत्साहात सुरु झाला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर तसेच नागरी सांस्कृतिक समिती सदस्यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटन झाले. त्यानंतर लक्षदिप हे या कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रख्यात निवेदक डॉ.नंदकुमार मुलमुले यांच्या उत्कृष्ट निवेदनाचा आविष्कार असलेल्या या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात प्रख्यात गायिका अनुजा वर्तक, मितांशू सावंत, सई जोशी या महाराष्ट्रातील गाजलेल्या दिग्गज कलावंतांनी दिवाळी पहाटचा पहिला दिवस गाजवला.

डॉ.नंदकुमार मुलमुले यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा तसेच जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगाचा व अनुभवाचा आधार घेवून जनसामान्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाला व सामाजिक जीवनाला स्पर्श करत आपल्या निवेदनात बहार आणली.  सुर निरागस हो लक्षदिप हे, आली माझ्या घरी हि दिवाळी, घनश्याम सुंदरा, प्रथम तुझ पाहता, रंगा येई वो गर्द सभोवती, एक लाजरा न साजरा मुखडा, माझे माहेर पंढरी, सेतू बांधा रे सागरी, कस काय पाटील बरं हाय कायं, आणि जयोस्तुते या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी हा कार्यक्रम वरचेवर रंगतदार ठरला.

तेराव्या वर्षीही नांदेडकरांनी दिवाळी पहाटला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा वाखाणण्याजोगा होता. बंदाघाटचा हा परिसर रंगीबेरंगी वस्त्रात आलेल्या युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी जल्लोषात व उत्साहात या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मतदानाच्या संदर्भात जनजागृती करुन यावर्षी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी तळमळीने काम करावे, असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!