नांदेड(प्रतिनिधी)-उस्माननगर पोलीसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोन जणांना पकडले आहे आणि चार आरोपी फरार झाले आहेत. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जीवंत काडतूस, तिन तलवार असा दरोडा टाकण्यासाठी उपयोगी येणारा हत्यार साठा पकडला आहे.
पोलीस ठाणे उस्माननगर येथील पोलीस उपनिरिक्षक सुनिल बाबुराव सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑक्टोबर रोजी रात्री 10.30 वाजेच्यासुमारास मौजे बामणी ता.कंधार येथील कलंबर खुर्द ते बारुळ जाणाऱ्या रस्त्यावर काही लोक उपस्थित असल्याच्या माहितीनंतर पोलीस तेथे पोहचले.तेथे त्यांनी प्रदीपसिंघ विजयसिंघ खालसा (24) आणि ओमकार शेषराव मुदीराज (23) या दोघांना पकडले. इतर चार आरोपी फरार झाले. पकडलेल्या दोघांकडून एक लोखंडी गावठी कट्टा(पिस्टल मॅग्झीनसह) दोन जीवंत काडतूस, तिन तलवारी, दोन मोबाईल, एक मोटारसायकल व दोरी, असा एकूण 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उस्माननगर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(4), 310(5) भारतीय हत्यार कायद्या कलम 4/25 आणि 3/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे, सुरज गुरव, कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर, सुनिल सुर्यवंशी, पोलीस अंमलदार नामदेव रेजितवाड, शिवपुजे, कुबडे, बलवान कांबळे, अनिरुध्द वाडे, शेख मकदुम यांचे कौतुक केले आहे.