नांदेड (प्रतिनिधी)-धर्माबाद आणि नांदेड ग्रामीण या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 लाख 5 हजार रुपये किंमतीच्या ऐवजाच्या चोऱ्या घडल्या आहेत. त्यात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीमध्ये धान्य चोरीला गेले आहे. तसेच तिसऱ्या एका चोरी प्रकरणात एसटी महामंडळाच्या विभागी कार्यशाळेतून 33 हजार 490 रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे.
हनमंत सायन्ना ठके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आनंदनगर धर्माबाद येथील त्यांचे घर कोणी तरी चोरट्यांनी 25 ऑक्टोबर रोजी रात्री फोडले त्यातून 40 हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 304/2024 नुसार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भालेराव हे करीत आहेत.
माधव मल्लीकार्जुन करंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 ते 24 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजेदरम्यान शुभम उद्योग वेअर हाऊस एमआयडीसी सिडको येथील दुकानाचे पाठीमागील शटर वाकवून चोरट्यांनी त्यातून सोयबीन, तांदुळ, ज्वारी , गहू असे 65 हजार रुपये किंमतीचे धान्य चोरी केले आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा घटना क्रमांक गुन्हा क्रमांक 968/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मांजरमकर अधिक तपास करीत आहेत.
एस. टी. महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेतून 23 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 ते 25 ऑक्टोबरच्या सकाळी 11.30 वाजेदरम्यान दोन एसटी वाहनांमधील चार बॅटऱ्या आणि केबल असा एकूण 33 हजार 490 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 533/2024 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार वसमतकर हे अधिक तपास करीत आहेत.