नांदेड(प्रतिनिधी)-भांडणात आपल्या आईला बसलेल्या चापटीचा बदला एका युवकाने मित्रासोबत मिळून चापट मारणाऱ्याचा खून करून घेतला. इतवारा पोलीसांनी या तिन मारेकऱ्यांना पकडल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. डी.गोरे यांनी तिन मारेकऱ्यांना चार दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.29 सप्टेंबर 2024 च्या अगोदर गणिमपुरा भागात दोन युवकांमध्ये भांडण झाले. त्यांची नावे अविनाश उर्फ भाऊ भारत नंदाने आणि व्यंकटेशप्रसाद उर्फ विक्की रामदास हिवरे असे होते. भांडणाला सोडविण्यासाठी अविनाशच्या आई मधे पडल् या तेंव्हा अविनाशवर व्यंकटेश प्रसादने उचललेला हात अविनाशच्या आईच्या गालावर लागला. त्या दिवशी भांडण मिटले आणि रात्री 11 वाजता व्यंकटेशप्रसाद हिवरे हा मित्रांकडे जाऊन येतो म्हणून गेला आणि तो परत आलाच नाही. या संदर्भाने हिवरे कुटूंबियांनी पोलीस ठाणे इतवारा येथे आपला मुलगा व्यंकटेशप्रसाद बाबत मिसिंग क्रमांक 58/2024 दाखल केला.
पुढे 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुदखेड तालुक्यातील वासरी गावाजवळच्या नदीपात्रात एक प्रेत सापडले आणि ते प्रेत व्यंकटेशप्रसाद उर्फ विक्की रामदास हिवरे(28) रा.सिध्दनाथपुरी, शंकराचार्य मठाच्या पाठीमागे याचे होते. त्यानंतर व्यंकटेशचे वडील रामदास गुणाजी हिवरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मागे झालेल्या भांडणात अविनाश नंदानेच्या आईला लागलेल्या चापटीचा बदला घेण्यासाठी अविनाश उर्फ भाऊ भारत नंदाने (24) रा.भोईसदन, गणीमपुरा नांदेड, राहुल जाधव (24) रा.भावेश्वरनगर मरघाट नांदेड आणि संतोष संजय जाधव (23) रा.मरघाट नांदेड या तिघांनी माझा मुलगा व्यंकटेशप्रसादला खंजीरने पाठीवर, डोक्यावर गंभीर वार करून त्याचा खून करून गोदावरी नदी पात्रात फेकले होते.
इतवारा पोलीसांनी या तक्रारीवरुन भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238, 3(5) आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 374/2024 दाखल केला. इतवारा पोलीसांनी भाऊ नंदाने, राहुल जाधव आणि संतोष जाधव या तिघांना अटक केली. आज सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.डी.मुळीक, पोलीस अंमलदार मिर्झा बेग, हबीब चाऊस, राजू घुले आदींनी मारेकऱ्यांना न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलीसांची विनंती चार दिवसांसाठी मान्य केली आहे.