नांदेड(प्रतिनिधी)-11 ऑक्टोबर रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या माफियांकडून पैसे घेणाऱ्या एका पोलीस उपनिरिक्षकासह चार पोलीसांना निलंबित केले. त्या दिवशी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहेगाव-भनगी या गावांमध्ये अंदाजे 300 ब्रास वाळू सापडली. परंतू महसुल विभागाने ही वाळु अंदाजे 80 ब्रास असल्याचे सांगितले. कोणाच्या आदेशाने या वाळुचा उपसा झाला याचा पत्ता लावण्यात महसुल विभागाला रत्तीभर रस नाही.
11 ऑक्टोबर रोजी लोहा वळण रस्त्यावर नांदेड जिल्ह्यातील पथक क्रमांक 6 चे पोलीस उपनिरिक्षक प्रविण हलसे आणि त्यांच्या चार सहकारी पोलीस अंमलदारांनी अवैध वाळु वाहुतकीसाठी पैसे घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर शहाजी उमाप यांनी त्या प्रकरणी चौकशी करून प्रविण हलसे आणि त्यांच्या चार सहकारी पोलीस अंमलदारांना निलंबित करून त्यांची प्राथमिक चौकशी प्रस्तावित केली.
यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी वाहेगाव आणि भनगी या गावांमध्ये जावून पाहणी केली असता गोदावरी नदीच्या काठावर वेगवेगळ्या सहा ठिकाणी वाळूची ढिगारे होती. ती वाळू अंदाजे 300 ब्रास आहे. रात्र झाल्यामुळे पुढची तपासणी आणि कार्यवाही उद्या होईल अशी माहिती पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाने दिली होती.
या संदर्भाने आज महसुल विभागाकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, अंदाजेच 80 ब्रास होती. सध्या ती वाळू शासकीय वाळू डेपोमध्ये जमा करण्यात आली आहे आणि तेथे साठवलेले नदीतून वाळू काढणारे तराफे महसुल विभागाने जाळून टाकले आहेत. पण महसुल विभागाला हा रेती उपसा कोणाच्या आदेशाने होत होता हे जाणून घेण्यात काहीच रस दिसत नाही. कायद्याच्या जाणकारांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अज्ञात रेती चोरांविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांचा तपास करता आला असता. कारण पोलीसांनी ज्यावेळी त्या गावात पाहणी केली त्यावेळी काही कामगार सुध्दा रेती काढतांना सापडले होते. म्हणजे वाहेगाव- भनगी गावात कोणाच्या आदेशावर, कोणाच्या पाठबळावर हा वाळू उपसा सुरू होता हे जाणण्याची काहीच गरज महसुल खात्याला वाटली नाही. यापेक्षा लोकशाहीतील मोठे दुर्देव तरी काय.