नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या कुटूंबातील व्यक्तीमध्ये व्यसनाचा शिरकाव झ ाला तर कुटूंब उध्वस्तच होते. त्यामुळे प्रत्येक जागी, प्रत्येक गावात सर्वांनी मिळून व्यसनापासून दुर राहण्यासाठी आणि राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये व्यसनमुक्त गाव मोहिम सुरू केली आहे. या संदर्भाने 11 ऑक्टोबर रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावात व्यसनमुक्त गाव मोहिमेची सुरूवात करण्यात आली. इतर तिन्ही जिल्ह्यांमध्ये या मोहिमेची सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमात हिंगोलीचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांचीही उपस्थिती होती.
या प्रसंगी पुढे बोलतांना शहाजी उमाप यांनी सांगितले की, आपल्या घरातील लेकरांना विशेष करून युवकांना व्यसनापासून दुर ठेवण्यासाठी प्रत्येकाने मेहनत करण्याची गरज आहे. कारण युवकांच्या माध्यमातून आपल्या घरात आलेले व्यसन, शेजाऱ्यांना त्रास देते, कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन कार्यक्रमात त्रास देते आणि त्यामुळे ते कुटूंब उध्वस्तीकडे जाते. अशा परिस्थितीत मी एकटा किंवा माझे पोलीस दल हे काम पुर्णपणे करू शकणार नाहीत. त्यासाठी गाव पातळीवर प्रत्येक व्यक्तीने आपल्या गावात व्यसन समाप्त होईल यासाठी अव्याहत प्रयत्न करणे आवश्यक आहे. याप्रसंगी हिंगोलीचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीही व्यसनमुक्तीसाठी पोलीस जे काम करणार आहेत. त्या कामांना जनतेने सकारात्मक आणि सक्रीय प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे सांगत जनतेकडून मदत करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भिकाजी कदम, दुर्गा व्यसनमुक्त गाव समितीच्या अध्यक्षा आयोध्याताई किर्तनकार, ग्राम रक्षक दलाचे जवान व ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस उपअधिक्षक सुरेश दळवे, नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरिक्षक बद्रीनाथ सानप हेही या कार्यक्रमात उपस्थित होते.