नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी काल अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकातील पथक क्रमांक 6 ने वाळू माफियांकडून पैसे घेतल्यानंतर त्यांना ताब्यात घेवून, त्यांना निलंबित करून त्यांच्याविरुध्द प्राथमिक चौकशी प्रस्तावित केली आहे. सन 2012 मध्ये सुध्दा शहाजी उमाप यांनी अशीच एक कार्यवाही एलसीबीच्या पथकाविरुध्द केली होती. आज निलंबित करण्यात आलेल्या पथकात पोलीस उपनिरक्षक प्रविण हालसे आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक पदावर शहाजी उमाप यांनी कामकाज सुरू करताच नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या चारही जिल्ह्यांमधून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथकाची स्थापना केली. नांदेड जिल्ह्यात या संदर्भाने 6 पथकांची स्थापना करण्यात आली. यामध्ये पथक क्रमांक 6 चे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक प्रविण हलसे हे होते. या पथकांनी काम सुरू केल्यानंतर काही जणांबद्दल बऱ्याच तक्रारी होत्या. प्रविण हालसेसोबत स्थानिक गुन्हा शाखेत काम केलेले पोलीस अंमलदार ब्रम्हानंद लामतुरे हे आणि इतर होते. या पथकाने अनेक जागी मोदकांच्या प्रसादानंतर बऱ्याच लोकांवर कायदेशीर कार्यवाही केली नाही. एक वाळूची गाडी 50 मोदकांच्या प्रसादानंतर रिकामी करून पोलीस ठाणे लिंबगाव येथे लावली होती. अनेक पानपट्टी धारकांकडून दोन मोदक देण्याची त्यांची ऐपत नसतांना त्यांच्याकडून 20-25 मोदक घेतले असे सर्व काही आलबेल सुरू होते.
दि.11 ऑक्टोबर रोजी पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना मिळालेल्या माहितीनुसार पथक क्रमांक 6 चे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक प्रविण हलसे आणि त्यांचे सहकारी लोहा वळण रस्त्यावर अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या लोकांकडून पैसे घेत असल्याची माहिती मिळाली . हे सर्व जण खाजगी गाडीत तेथे गेले होेते. ते पथक लोहा येथून निघाल्यानंतर शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनात कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांना पाठविण्यात आले. परंतू अश्र्विनी जगताप लोहा येथे पोहचण्यापुर्वीच पथक क्रमांक 6 खाजगी वाहनाने नांदेडकडे रवाना झाले होते. नांदेड शहरातील तिरंगा चौकात अश्र्विनी जगताप यांनी त्या खाजगी वाहनाला रोखले. तेंव्हा त्यात पोलीस उपनिरिक्षक प्रविण हलसे आणि पोलीस अंमलदार ब्रम्हानंद लामतुरे होते. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 1 लाख 3 हजार रुपये मिळाले. त्यांच्यासोबतचे इतर तीन पोलीस अंमलदार महेश कावळे, तुकाराम जुन्ने आणि राम मुळे हे तिघे परतीच्या प्रवासात लोहा येथेच थांबले होते. आपल्याकडे असलेल्या रोख रक्कमेबद्दल त्यांना स्पष्ट उत्तर देता आले नाही म्हणजे ते पैसे अवैध धंदेवाल्यांकडून घेतल्याची शंका आहे म्हणून या पाच जणांना निलंबित करून त्यांची प्राथमिक चौकशी प्रस्तावित करण्याचे आदेश शहाजी उमाप यांनी दिले आहेत. ही प्राथमिक चौकशी देगलूर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी यांच्याकडे देण्यात आली आहे.
वाळू वाहतुकीची अधिक माहिती घेतली असता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौेजे वाहेगाव भनगी या भागात नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांना या बाबतची खातरजमा करण्यासाठी भनगी वाहेगाव येथे पाठविले. त्या ठिकाणी 50 तराफ्यांमधून 100 पेक्षा जास्त मजुर ांच्या सहाय्याने वाळू उपसा होत होता. या गावाच्या नदीकाठी विविध 6 ठिकाणी 300 ब्रासपेक्षा जास्त वाळू नदीपात्रातून काढून बाहेर ठेवलेली होती.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून महसुल विभागाला तेथे पाचारण केले. आज दसरा असतांना सुध्दा त्या ठिकाणी पोलीस पहारा देत आहेत आणि उर्वरीत पंचनाम्याची कार्यवाही आज होणार असल्याची माहिती पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाने दिली आहे.