नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेत अवैध धंदे करणाऱ्यांसोबत रात्री मिटींग करणाऱ्या एका पोलीस निरिक्षकाला बाहेर पाठविल्यानंतर सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेतील नदीपलिकडून आलेल्या एका पोलीस अंमलदाराने एक गुप्त मिटींग घडविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नदीपलिकडून अगोदर शिवाजीनगर आणि नंतर स्थानिक गुन्हा शाखेत आलेल्या एका पोलीस अंमलदाराला नदीपलिकडे बोलाविण्यात आले आणि त्याने त्या ठिकाणी, त्या भागात वेगवेगळे अवैध धंदे करणाऱ्या लोकांची मिटींग त्या पोलीस ठाण्यातील प्रभारी पोलीस निरिक्षकासोबत करून दिल्याची चर्चा आहे. नदी पलिकडून आलेला हा पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हा शाखेत सुध्दा रेतीच्या कारभारावर वचक आणण्याची किंवा त्या रेतीच्या कारभारातून मोती शोधून काढण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परंतू सध्या पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या भितीने कोणीच अवैध धंदा करणारा व्यक्ती मोत्यांबद्दल बोलत नाही. अशी परिस्थिती असतांना सुध्दा गुप्त मिटींग का घडविण्यात येते हा मोठा प्रश्न आहे. स्थानिक गुन्हा शाखेत जुन्या रेती वाल्याकडून नवीन रेतीवाल्याकडे प्रभार बदलण्याची प्रक्रिया सुरू असतांना नदी पलिकडे जाऊन गुप्त मिटींगचा एक नवीन प्रकार समोर आला आहे.
म्हणतात ना जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. याच प्रमाणे हा कारभार सुरू असेल. ज्यांनी -ज्यांनी अशा प्रकारचे कारभार केला आहे त्यांचा ईतिहास पाहिला असतांना त्यांचे कधीच काही भले झाले नाही हा अभिलेख असतांना लालसा मात्र सुटत नाही. हाच मोठा जीवनाचा गुंता आहे. कारण एक विचारवंत म्हणतात जीवनाचे खरे संगीत असे समजून घ्या की, तुमच्या खिशात जोपर्यंत लक्ष्मीकांत आहेत तो पर्यंत तुम्ही सर्वांचे प्यारेलाल आहात.