नांदेड(प्रतिनिधी)-तोंडी आदेशाने स्वच्छता निरिक्षक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने एका महिलेच्या गैरहजऱ्यांचा अहवाल न पाठविण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला जेरबंद केले.
सफाई कामगार महिलेने 30 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड वाघाळा महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्रमंाक 1 येथील स्वच्छता निरिक्षक अकबर खान उस्मानखान (47) हे सप्टेंबर महिन्यातील खाड्यांचे दिवस बाबत अहवाल न पाठवायचा असेल तर तुला चार हजार रुपये लाच द्यावी लागेल. महिलेने दिलेल्या तक्रारीची पडताळणी 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आली तेंव्हा अकबर खानने 25 दिवसांचे खाडे टाकेल म्हणून 5 हजार रुपये लाचेची मागणी केली आणि त्यातील पहिला हप्ता 2 हजार रुपयांचा चैतन्यनगर येथील मंगेश मेडीकलसमोर अकबर खानने उभ्या केलेल्या दुचाकी गाडीवरील पेट्रोल टाकीच्यावर असलेल्या कप्यात टाकण्यास सांगितले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अकबरखानला लगेच ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुध्द विमानतळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, लोकसेवक, कर्मचारी, किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी माणुस (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फिस व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असेल तर जनतेने दुरध्वनी क्रमांक 02462-253512 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 वर याची माहिती द्यावी.
तोंडी आदेशाने काम करणे हा एक वादातीत विषय आहे. या लाच प्रकरणातील स्वच्छता निरिक्षक अकबर खान उस्मान खान यांचे मुळ पद काय माहित नाही पण ते तोंडी आदेशाने स्वच्छता निरिक्षक पदाचे काम पाहत होते असे सांगण्यात आले. तोंडी आदेशाने केलेल्या कामाच्या मोबदल्यात लाच मागणीचा हा प्रकार म्हणजे सर्वच तोंेडी आदेशातील काम करणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे जास्तीची लाच मिळविण्यासाठीच काम करतात असे दिसते.