मोटार वाहन निरिक्षक आणि खाजगी इसम अडकले 500 रुपयांच्या लाच जाळ्यात ; दोघांना चार दिवस पोलीस कोठडी

देगलूर सिमा तपासणी नाक्यावर घडला प्रकार ; अमरावती एसीबीने केली कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-आरटीओ सिमा तपासणी नाका देगलूर येथे एका तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 500 रुपये लाच स्विकारल्याच्या कारणावरून मोटार वाहन निरिक्षक वर्ग-2 आणि एक खाजगी इसम यांंच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरटीओ कार्यालयात 63 हजार 820 रुपये बेहिशोबी रक्कम सापडल्याचे अमरावती एसीबी पथकाने जारी केलेल्या प्रेसनोटमध्ये लिहिले आहे. बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश कोठालीकर यांनी दोघांना 4 दिवस अर्थात  30 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
वाशिम बायपास जि.अकोला येथे राहणाऱ्या एका तक्रारदाराचे ट्रक अकोला हैद्राबाद या रस्त्यावर धावतात. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आरटीओ विभागाचे अधिकारी आणि त्यांनी ठेवलेले खाजगी एजंट हे ट्रकचे सर्व कागदपत्र बरोबर असतांना, वजन बरोबर असतांना एंट्री म्हणून प्रत्येक ट्रकसाठी 500 रुपये लाच मागणी करतात. 24 सप्टेंबर रोजी या तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 25 सप्टेंबर रोजी पडताळणी केली आणि पंचासमक्ष 500 रुपयांची लाच अर्थात एंट्री घेण्याचे मोटार वाहन निरिक्षक अमोल धर्मा खैरनार (42) यांनी मान्य केले आणि तक्रारदाराने 500 रुपये गोपाळ म्हैसाजी इंगळे (41) याला दिले. 500 रुपयांची लाच स्विकारताच अमरावती एसीबी पथकाने अमोल खैरनार आणि गोपाळ इंगळेला ताब्यात घेतले. त्यानंतर तेथे असणाऱ्या अमोल खैरनार यांच्या कार्यालयाची तपासणी केली तेंव्हा त्यात 63 हजार 820 रुपये रोख रक्कम मिळाली. त्याबद्दल अमोल खैरनार यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. या 63 हजार 820 रुपयांच्या नोंदी कॅशबुक किंवा रजिस्टरमध्ये दिसल्या नाहीत.
अमरावती एसीबी पथकाने अमोल खैरनार आणि गोपाळ इंगळे विरुध्द देगलूर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास नांदेड एसीबी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक मारोती जगताप, अपर पोलीस अधिक्षक सचिंद्र शिंदे, अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक मंगेश मोहड, पोलीस निरिक्षक केतन मांजरे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदार युवराज राठोड, राजेश मेटकर, आशिष जांभोळे आणि वैभव जायले यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी या माहितीसह जनतेला आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने कोणी खाजगी इसम नागरीकांचे कोतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांच्यासोबत त्वरीत संपर्क साधावा. जनतेच्या सुविधेसाठी दुरध्वनी क्रमांक 0721-2552355 आणि टोल फ्रि क्रमांक 1064 सुध्दा उपलब्ध असल्याचे नमुद केले आहे.
नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरिक्षक जमीर नाईक यांनी आरटीओ विभागातील मोटार वाहन निरिक्षक अमोल खैरनार आणि त्यांच्यावतीने 500 रुपयांची लाच स्विकारणारा गोपाळ इंगळे यांना आपल्या पोलीस अंमलदारांसह बिलोली न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीश कोठालीकर यांनी खैरनार आणि इंगळेला 4 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. बिलोलीचे सरकारी वकील एड. संदीप कुंडलवाडीकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!