नांदेड,(प्रतिनिधी)- राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर पर्यंत 100 टक्के ई-केवायसी प्रक्रिया करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या scagridbt.mahaitgov.in या वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्या करिता कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय आर्थिक सहाय्य योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्या आधार-सीड बँक खात्यांपर्यंत पोहोचते याची खात्री करण्यासाठी राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली. त्याकरिता शेतकऱ्यांनी नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन आपले ई-केवायसी पक्रिया पुर्ण करून घ्यावे. केवायसी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावरच एक वेळ अनुदान वितरणासाठी शेतकरी पात्र ठरतील. शेतकऱ्यांनी 27 सप्टेंबर 2024 पर्यंत 100 टक्के ई-केवायसी प्रक्रिया करावी. लवकरच अर्थसहाय्य वितरीत करावयाचे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना केले आहे.