नांदेड(प्रतिनिधी)-बाळू मामाच्या भक्तीतून सोन्याचे कुंड मिळवून देतो म्हणणाऱ्या भोंदूबाबा विरुध्द माळाकोळी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गंगाबाई ज्ञानोबा केंद्रे रा.माळहिप्परगा ता.जळकोट जि.लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बाळु मामा या संतांचे भक्त घोटका येथील अंबादास महाराज आणि त्यांचे मेहुणे शेषराव बाबुराव होळकर रा.चिखला ता.अहमदपूर जि.लातूर यांनी आमचा एक मुलगा मरण पावल्यानंतर बाळू मामाची भक्ती करण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही बाळु मामाची भक्ती करून समाधान मिळेल. या आशेने त्यांची भक्ती करू लागलो. प्रत्येक एकादशी व प्रत्येक आमवशीला महाराजांच्या घोटका येथील बाळू मामा मंदिरात वाऱ्या करू लागलो. तुमच्या गावात पालखी घेवून जावे लागेल. तर तुम्हाला आशिर्वाद मिळेल असे सांगितल्याने आम्ही पालखी घेवून गावात गेलो. त्यासाठी आम्हाला 1 लाख रुपये देणगी द्यावी लागली. गावात पालखीची तिन दिवस सेवा केल्यानंतर अंबादास महाराजांनी आम्हाला आपल्या जवळील पितळेच्या तांब्यातून 3 सोन्याच्या अंगठ्या दिल्या. त्याची तपासणी आम्ही सोनाराकडे केली. तेंव्हा त्या अंगठ्या सोन्याच्या आहेत असे आम्हाला कळले. म्हणून आमचा महाराजांवर जास्तच विश्र्वास बसला.
जानेवारी 2024 मध्ये बाळू मामाचा आशिर्वाद अजून जास्त हवा असेल तर मी सोन्याचे कुंड काढून देतो असे सांगितले. इतरांनी सुध्दा सोन्याचे कुंड मिळवले आहेत. असे सांगितल्याने आम्ही अंबादास महाराजांचे मेहुणे शेषराव बाबूराव होळकर यांना विचारणा केली असता त्यांनी मला सुध्दा कुंड मिळाले असल्याचे सांगितल्याने आमचा सुध्दा विश्र्वास वाढला. सोन्याच्या कुंडाचे आमिष दाखवून आमच्याकडून 10 लाख रुपये काढून घेतले. आमचा मुलगा भरत ज्ञानोबा केंद्रे याने सुध्दा सोन्याचे कुंड काढून देण्यासाठी महाराजांना 9 लाख रुपये दिले. सोन्याची कुंड मिळत नाही याची विचारणा केली असता अंबादास महाराजांनी आम्हाला 500 ग्रॅम सोन्याचे दागिणे दिले आणि 20 दिवस पुजा करा व 21 व्या दिवशी विकून पैसे घ्या असे म्हणाले. यानंतर आम्ही 21 व्या दिवशी सोने विकण्यासाठी गेलो असतांना ते सोने खोटे असल्याचे समजले. त्यानंतर मी माझे पती ज्ञानोबा आणि मुलगा भरत 30 जुलै रोजी महाराजांकडे जाऊन तुम्ही दिलेले दागिणे हे सोन्याचे नाहीत हे सांगितले. तेंव्हा त्यांनी 2 ऑगस्टला येवून पैसे घेवून जा असे सांगितले. पण नंतर महाराजांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. माळाकोळी पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 34 नुसार गुन्हा क्रमांक 219/2024 दाखल केला असून माळाकोळीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक हाके अधिक तपास करीत आहेत.