नांदेड(प्रतिनिधी)-31 ऑगस्ट रोजी पोलीस अधिक्षकांनी नांदेड जिल्ह्यातील 622 पोलीसांना नवीन नियुक्त्या दिल्या खऱ्या पण त्यावेळी कोणालाही प्रत्यक्ष भेटून मागणी करता आली नाही. त्यामुळे बऱ्याच पोलीसांच्या बदल्या त्यांच्या मुळ तालुक्यात झाल्या आहेत. पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पोलीसांची नियुक्ती त्यांच्या मुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
नुतन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी 31 ऑगस्ट रोजी 622 पोलीस अंमलदारांना नवीन नियुक्त्या दिल्या. सर्वसाधारणपणे सर्व पोलीसांना एकत्र बोलावून समुपदेशन पध्दतीने बदल्या होण्याची प्रथा आता पोलीस दलात रुढ झाली आहे. परंतू कामाच्या व्यस्थतेत हा समुपदेशनाचा वेळ यंदा पोलीसांना मिळाला नाही. पण बदल्या तर झाल्या आहेत. आजपर्यंत बदल्या झालेल्यांमधील काही जण वगळता कोणीच नव्या ठिकाणी गेलेले नाहीत. जे गेले आहेत त्यांनी ऍडजेस्टमेंट केलेली आहे. म्हणून ते गेले. त्यांचे कामकाज सुरू झाले आहे.
या बदल्यांमध्ये बऱ्याच पोलीस अंमलदारांच्या बदल्या त्यांच्या मुळ तालुक्यात झाल्या आहेत. पुढे येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर त्या पोलीस अंमलदारांना मिळालेल्या नवीन नियुक्त्या त्यांच्या मुळावर येण्याची चिन्हे दिसत आहे. मुळ तालुक्यात, मुळ गावात काही व्यक्ती त्या पोलीस अंमलदारांच्या प्रेमाचे असतील तर काही त्यांचे विरोधकही असतील. त्यांच्या विरोधकांनी फक्त त्या पोलीस अंमलदाराला त्रास देण्यासाठी निवडणुक आयोगाकडे अर्ज केला तर त्या पोलीस अंमलदाराची त्वरीत प्रभावाने वाट लागेल. काही पोलीस अंमलदारांनी या संदर्भाने अर्ज दिले आहेत. पण त्यावर काही कार्यवाही झालेली नाही. त्या शिवाय अनेक पोलीस अंमलदारांनी बदली झालेल्या ठिकाणी त्यांना होणाऱ्या दुसऱ्या अडचणी मांडून सुध्दा अर्ज दिले आहेत. परंतू त्यावरही काही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भाने पोलीस अधिक्षकांनी पोलीस कल्याणाचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.