नांदेड(प्रतिनिधी)-शेती बियाण्यांसाठी दिलेल्या पैशांच्या कारणावरुन खून केल्याचा प्रकार मौजे कोळगाव शिवारात घडला. मारेकऱ्याने पतीसोबतच्या वादाचा बदला पत्नीचा खून करून घेतला. या हल्यात एक दुसरी महिला पण गंभीर जखमी झाली आहे. हदगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रामचंद्र माने यांनी मारेकऱ्याना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
मारोती विठ्ठलराव जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा मावस भाऊ शंकर बाबाराव जगताप यास बी-बियाणे खरेदीसाठी पैसे दिले होते. पैसे परत न देणाऱ्या शंकर बाबाराव जगताप सोबत नंतर वाद झाला. दि.19 सप्टेंबरच्या सकाळी मारोती जाधव आणि त्यांच्या पत्नी रेखाबाई हे शेतात कामाला गेले. त्या ठिकाणी शेतीची हिस्सेदार चुलत बहिण मायाबाई मारोती शिंदे या पण होत्या. दुपारपर्यंत तिघांनी शेतीचे काम केल्यानंतर मारोती जाधव हे हरडपकडे गेले. तेथे त्यांना फोन करून गावातील लोकांनी सांगितले की, शेतात काम करणाऱ्या रेखाबाई हिला शंकर बाबाराव जगतापने कोयत्याच्या सहाय्याने मारून जखमी केले आहे. तसेच मायाबाई सुध्दा जखमी आहेत. अगोदर तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार झाला. परंतू पुढे मोठ्या दवाखान्यात पाठविल्यानंतर 20 तारखेच्या मध्यरात्रीनंतर रेखाबाईचा मृत्यू झाला. मायाबाई गंभीर जखमी आहेत. या दोन्ही बहिणींच्या हातावर, डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर, पाठीवर कोयत्याने निर्दयीपणे अनेक वार केले आहेत. तामसा पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 352 प्रमाणे गुन्हा क्रमांक 111/2024 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तामसाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक के.व्ही. शिंदे हे करीत आहेत. गुन्हा दाखल होताच तामसा पोलीसांनी शंकर बाबराव जगताप (45) रा.कोळगाव ता.हदगाव यास अटक केली. आज तामसा पोलीसांनी शंकर जगतापला न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. पोलीसांचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश रामचंद्र माने यांनी मारेकऱ्याला दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड.गिरीश मोरे यांनी सादरीकरण केले. तर आरोपी च्या वतीने ॲड. अतुल चौरे यांनी काम बघितले.