रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज; मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार किनवट (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मदनापूर परिसरात रेल्वे रुळावर पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजता धावत्या पॅसेंजर रेल्वेची धडक बसल्याने वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाची पाहणी करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. नांदेडच्या वनविभागातील अधिकारी मनीषा पाटील यांनी वाघाच्या मृत्यूच्या घटनेला दुजोरा दिला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व तपासानंतर स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले. पंधरा दिवसांपासून वाघाच्या दर्शनाची चर्चा गेल्या पंधरा दिवसांपासून किनवट तालुक्यातील शनिवारपेठ, प्रधानसांगवी, मदनापूर, दाभाडी आणि भुलजा या परिसरात वाघ दिसल्याची चर्चा सुरू होती. या भागात वाघाचा वावर असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच भीतीचे वातावरणही होते. अशातच मदनापूर परिसरातील रेल्वे रुळावर वाघाचा मृतदेह आढळल्याने या चर्चेला आता वेगळे वळण मिळाले आहे. हा वाघ नेमका कोणत्या जंगलातून या परिसरात आला? त्याचा अधिवास कोणत्या वनक्षेत्रात होता? तसेच त्याचा मृत्यू रेल्वेच्या धडकेमुळेच झाला की अन्य काही कारणामुळे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. अपघात की अन्य कारण? वनविभागाचा तपास वाघाचा मृत्यू रेल्वे अपघातात झाला असण्याची शक्यता प्राथमिक स्तरावर व्यक्त केली जात असली, तरी त्याबाबत अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळावरील तपासातून मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या परिसरातील वाघाच्या हालचालींबाबत वनविभागाकडून अधिक माहिती संकलित केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके वास्तव स्पष्ट होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 167 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट अन् दिल्लीच्या राजकारणात उठलेले वादळ