नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; मृताची ओळख पटविण्यात यश नांदेड (प्रतिनिधी) :- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मृताची ओळख पटविली असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उमरी येथून चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करून मृताची ओळख पटविणे आणि आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करताना मृत व्यक्तीची ओळख पटली. मृताचे नाव अनिल गौतम कीर्तने (वय २५ वर्षे), मूळ रा. वसमत, जिल्हा हिंगोली, सध्या रा. भाग्यनगर, नांदेड, असे असल्याचे निष्पन्न झाले. अनिल हा भंगार गोळा करून उदरनिर्वाह करत होता. पुढील तपासादरम्यान सागर गणेश गायकवाड आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी मिळून हा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तपासात या गुन्ह्यात मनोज कोलते हा चौथा साथीदार सहभागी असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. चारही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अर्धापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे 1) सागर गणेश गायकवाड (वय 25 वर्ष, रा. थेरगाव गावठाण, पिंपरी चिंचवड, पुणे) 2) प्रशिक ऊर्फ चिक्या संजय कांबळे (वय 22 वर्ष, रा. रामपूर, ता. देगलूर, जि. नांदेड, ह.मु. थेरगाव गावठाण, पिंपरी चिंचवड, पुणे) 3) राहल मारोती दासरवाड (वय 24 वर्ष, रा. ढाकणी, ता. लोहा, जि. नांदेड, ह.मु. थेरगाव गावठाण, पिंपरी चिंचवड, पुणे) 4) मनोज अनिल कोलते (वय 21 वर्ष, रा. सिंधी, ता. उमरी, जि. नांदेड) ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस कर्मचारी रविशंकर बामणे, चंद्रकांत स्वामी, शेख अझरोद्दीन, अनिल बिरादार, सुधाकर देवकते, राज सिटीकर, दीपक ओढणे आणि सायबर सेलचे रेश्मा पठाण यांनी सहभाग घेतला. Kanthak Suryatal Post Views: 213 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गोदावरी पात्रातील ९ मोठ्या बोटींसह ३ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल नष्ट; वाळू माफियांवर मोठा जरब