८ मोबाईल, ४ दुचाकींसह ३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त ; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर (प्रतिनिधी) –  जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अहमदपूर येथील जुगार अड्ड्यावर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईत तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण ३ लाख १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नांदेड परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत त्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष पथक लातूर जिल्ह्यात कारवाईसाठी पाठवले होते. त्यानुसार पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अहमदपूर शहरात ही कारवाई केली.

मुख्य बाजारपेठेतील बंद खोलीत जुगार

१५ ऑक्टोबर २०२६ रोजी अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य बाजारपेठ परिसरात ही धाड टाकण्यात आली. बळीराज ग्रो दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या भगवान बोकारे यांच्या वाड्यातील एका बंद खोलीत काही जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून १७ हजार १०० रुपयांची रोख रक्कम, आठ मोबाईल फोन आणि चार मोटारसायकली जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख १८ हजार १०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद

या प्रकरणात एकूण सात जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८१/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाराच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम राबवली. या विशेष कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोलीस हवालदार प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संबंधित अधिकारी आणि अंमलदारांचे अभिनंदन केले.

अवैध धंद्यांची माहिती खबर हेल्पलाइनवर द्या

नागरिकांना आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवता यावी, यासाठी नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने खबर हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनचा मोबाईल क्रमांक ९१५०१००१०० असा आहे. नागरिकांनी आपल्या भागात जुगार अड्डे किंवा अन्य अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती असल्यास ती ‘खबर’ हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शहाजी उमाप यांनी केले आहे. नागरिकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वासही पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!