नांदेड–हिंगोली महामार्गावरील घटनेने खळबळ; डोक्यावर, गळ्यावर आणि छातीवर वार करून तरुणाचा खून

अर्धापूर (प्रतिनिधी) –  नांदेड–हिंगोली महामार्गावरील अर्धापूर परिसरात २५ वर्षीय तरुणाची अज्ञात आरोपीने धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३८ वाजण्यापूर्वी अर्धापूर शेतशिवार परिसरात अनिल गौतम कीर्तने  (वय २५ वर्षे, रा. औंढा जि. हिंगोली, ह.मु. कवठा रोड, वसमत) यांच्यावर अज्ञात आरोपीने हल्ला केला. आरोपीने अज्ञात कारणावरून अनिल यांच्या डोक्यावर, गळ्यावर आणि छातीवर हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचे वडील गौतम शंकर कीर्तने (वय ५२ वर्षे, रा. औंढा, जि. हिंगोली, ह.मु. कवठा रोड, वसमत) यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७१/२०२६, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत. तरुणाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, आरोपी कोण आहे आणि या घटनेमागे कोणते कारण आहे, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. अर्धापूर परिसरात घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, आरोपीचा शोध घेऊन हत्येचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!