नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था, पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता आणि जनतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप हे बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. याचवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी प्रत्यक्ष ऐकून घेण्यासाठी विशेष वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. दुपारी २.०० ते ३.३० वाजेपर्यंत पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे नागरिकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाशी संबंधित तक्रारी, प्रलंबित प्रश्न, अडचणी अथवा आपल्या स्तरावर मांडावयाच्या बाबी असलेल्या नागरिकांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू थेट मांडण्याची ही महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप हे नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यांच्या पोलीस प्रशासनाची देखरेख करतात. परिक्षेत्रातील पोलीस यंत्रणेच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधण्याच्या माध्यमातून प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करण्यावर भर दिला जात आहे. दर महिन्याला परिक्षेत्रातील एका जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्याचा उपक्रम राबविला जातो. त्याच अनुषंगाने यावेळी नांदेड जिल्ह्यात हा जनतेशी थेट संवाद होणार आहे. नागरिकांनी कोणत्याही संकोचाशिवाय आपल्या समस्या आणि तक्रारी घेऊन दि. ३० सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३.३० या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्राकडून करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर थेट समस्या मांडण्याची ही संधी नागरिकांनी गांभीर्याने घ्यावी आणि तिचा योग्य पद्धतीने लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 30 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड जिल्हा पोलीस दलात ८७ पोलीस अंमलदारांना नवीन नियुक्त्या,काही बदल आणि काहींना स्थागिती