नांदेड (प्रतिनिधी) – आपत्कालीन मदत मिळविण्यासाठी असलेल्या डायल ११२ या हेल्पलाइनवर वारंवार खोटे कॉल करून पोलिसांना नाहक त्रास देणे, सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करून शांतता भंग करणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नायगाव पोलिसांनी एका २८ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रावसाहेब दत्ता गायकवाड (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. टाकळी (त.मा.), ता. नायगाव, जि. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेसनोटनुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.५९ ते ३.३४ वाजेदरम्यान आरोपी रावसाहेब गायकवाड याने डायल ११२ वर वारंवार संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यानुसार डायल ११२ ड्युटीवर कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड यांना कॉल प्राप्त होताच पोलीस पथक तातडीने टाकळी येथील मारोती मंदिरासमोर पोहोचले. पोलिसांनी संबंधित इसमाकडे त्याला नेमकी काय अडचण आहे, याची विचारपूस केली असता, त्याने कोणतीही योग्य माहिती दिली नाही. उलट सार्वजनिक रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करून पोलिसांना नाहक त्रास देण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपीने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. संशयिताच्या हालचाली आणि तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवरून त्याने मद्यप्राशन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोपी मद्याच्या अमलाखाली असल्याचे प्रमाणित केले. या प्रकरणी आरोपी रावसाहेब दत्ता गायकवाड याच्याविरुद्ध नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २१७ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ८५(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक अमोल भगत, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड, शेरीकर आणि विनोद भंडारे (सर्व नेमणूक नायगाव पोलीस ठाणे) यांनी ही कारवाई पार पाडली. खोटे कॉल करणे गुन्हा : डायल ११२ ही आपत्कालीन सेवा असून नागरिकांनी केवळ वास्तविक संकटाच्या वेळीच या क्रमांकावर संपर्क साधावा. खोटी माहिती देणे किंवा मस्करीसाठी कॉल करून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणे हा गुन्हा असल्याचे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 28 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मुखेडमध्ये अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४५.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त