२७ ते २९ सप्टेंबरदरम्यान १६ तालुक्यांतील विविध वस्त्यांमध्ये भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान नांदेड (जिमाका)- विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे, ओळखपत्रे तसेच विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील १६ तालुक्यांमधील निश्चित भटके-विमुक्त वस्त्यांमध्ये विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली असून, नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. एकाच ठिकाणी विविध प्रमाणपत्रांसाठी सुविधा विशेष शिबिरांमध्ये जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवास/अधिवास दाखला, विवाह नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र आणि आयुष्मान भारत कार्ड आदी कागदपत्रांसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम-किसान योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. १६ तालुक्यांतील निश्चित वस्त्यांमध्ये शिबिरे अभियानासाठी जिल्ह्यातील भटके-विमुक्त वस्त्यांचे प्रत्यक्ष क्षेत्रीय सर्वेक्षण करून शिबिरस्थळे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय समितीवरील नियुक्त अशासकीय सदस्यांनी केलेल्या क्षेत्रीय सर्वेक्षणाच्या आधारे ही ठिकाणे निश्चित करण्यात आली असून, स्थानिक गरजेनुसार आवश्यकतेनुसार इतर वस्त्यांचाही अभियानात समावेश करण्यात येणार आहे. कंधार तालुक्यात धर्मापुरीतांडा, बाळांतवाडीतांडा, गुलाबवाडी तांडा, पांगरातांडा व बाचोटी तांडा; भोकर तालुक्यात आमठाणा; हिमायतनगर तालुक्यात पवना; मुखेड तालुक्यात मुखेड, जांब, जाहूर, येवती, मुक्रमाबाद, बा-हाळी, अंबुलगा बु. व चांडोळा; तसेच बिलोली तालुक्यात बिलोली, रुद्रापूर व आदमपूर येथे दि. २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. देगलूर तालुक्यात देगलूर, खानापूर, नरंगल, शहापूर, मरखेल, माळेगाव व हाणेगाव येथे दि. २९ सप्टेंबर; माहूर येथे दि. २८ सप्टेंबर; तर किनवट तालुक्यात गोकुंदा, बोधडी व सिंदघी येथे दि. २७ सप्टेंबर, जलधरा, इस्लापूर व शिवणी येथे दि. २८ सप्टेंबर आणि दहेली, उमरी बाजार व मांडवी येथे दि. २९ सप्टेंबर रोजी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. नांदेड तालुक्यात वाघीतांडा व भोईगल्ली येथे दि. २७ सप्टेंबर, कासारखेडा येथे दि. २८ सप्टेंबर आणि हेमलातांडा (बाभुळगाव) येथे दि. २९ सप्टेंबर; अर्धापूर येथे दि. २८ सप्टेंबर; मुदखेड तालुक्यात नंदीवसाहत व दरेगाव तांडा आणि उमरी येथे दि. २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान शिबिरे घेण्यात येणार आहेत. हदगाव तालुक्यात निवघा येथे दि. २८ सप्टेंबर; धर्माबाद येथे धर्माबाद व जारीकोट येथे दि. २८ सप्टेंबर तसेच बाचेगाव व सिरजखोड येथे दि. २९ सप्टेंबर; लोहा तालुक्यात माळेगाव व मारतळा येथे दि. २८ सप्टेंबर आणि लोहा व कलंबर येथे दि. २९ सप्टेंबर; तर नायगाव तालुक्यात कुंटूरतांडा व कांडाळा येथे दि. २९ सप्टेंबर रोजी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जुनी कागदपत्रे, ओळखपत्रे सोबत आणण्याचे आवाहन लाभार्थ्यांनी शिबिरास येताना उपलब्ध असलेली जुनी कागदपत्रे, ओळखपत्रे व संबंधित आवश्यक पुरावे सोबत आणावेत. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संबंधित प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यवाही सुलभ होण्यास मदत होणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील पात्र नागरिकांना शासकीय योजना व आवश्यक प्रमाणपत्रांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. संबंधित नागरिकांनी आपल्या जवळील आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित शिबिरस्थळी उपस्थित राहून उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, नांदेड आणि सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 63 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात २९ सप्टेंबर रोजी शौर्यदिन बातमी नव्हे, लोकशाहीच्या आजाराचे लक्षण: इंडियन एक्स्प्रेसचा खळबळजनक तपास