सिंचननगरातील घटनेने खळबळ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील सिंचननगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता सिंचननगर, नांदेड येथे आरोपी मयूर ऊर्फ मोनू लोणे व एक विधिसंघर्षित बालक यांनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलगा प्रतीक बालाजी ससाणे (वय २० वर्षे) याच्यावर जुन्या भांडणाच्या कारणावरून हल्ला केला. हल्लेखोरांनी प्रतीक याला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. याप्रकरणी प्रतीकची आई महानंदा बालाजी ससाणे (वय ३७, रा. सिंचननगर, नांदेड) यांनी भाग्यनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ४९५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १०९(१), ३५२, ३(५) तसेच शस्त्र कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कसबेगाव करीत असून, गुन्ह्यातील आरोपी ताब्यात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेतील इतर बाबींचा तपास सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,077 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मराठा आरक्षणासाठी नांदेड कडकडीत बंद हज यात्रेकरूंच्या सुविधांसाठी अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदन