नेत्यांना प्रश्न विचारला की थेट मध्यरात्री अटक? कोथरूडमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा!

नियम फक्त सामान्य जनतेला? नंबर प्लेट नसलेल्या आमदारांची मस्ती अन् प्रश्न विचारणाऱ्या युट्युबरला मध्यरात्री पोलीस गस्ती !

पुणे (प्रतिनिधी) – नेत्यांना प्रश्न विचारणे आणि त्यांच्यावर टीका करणे सामान्य नागरिकाला किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय पुण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील विकासकामांवर युट्युबच्या माध्यमातून थेट आणि बोचरे प्रश्न उपस्थित करणारे युट्युबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी ३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास राहत्या घरातून अटक केली आहे. पोलीस पथकाने मध्यरात्री त्यांच्या घराचे दार आणि खिडक्या वाजवून त्यांना ताब्यात घेतले, ज्याचा संपूर्ण थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चंद्रकांत पाटलांवर तोफ अन् बदनामीचा गुन्हा! महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मिताली साळवेकर यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सारिका कांबळे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. जनतेच्या पैशातून खाल्लेले खाव नेते जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला कधीच पुढं येत नाहीत, हा म्हातारा पण त्यातलाच आहे, असे वक्तव्य संतोष पंडित यांनी आपल्या एका व्हिडिओमध्ये केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परता दाखवत भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आणि मध्यरात्रीच अटकेची मोठी कामगिरी फत्ते केली. या प्रकरणाचा तपास आता पोलीस निरीक्षक अनिल माणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

अटक केल्याबद्दल धन्यवाद! – पोलिसांसमोरच टोलेबाजी अटकेच्या वेळी संतोष पंडित यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या या कार्यपद्धतीचा व्हिडिओ शूट केला. रात्री साडेबारा-एक वाजता घरात घुसून पोलीस जर अशी छळवणूक करणार असतील, तर सामान्य नागरिकांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल पंडित यांनी उपस्थित केला. पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढत आणि प्रचंड उपरोधाने त्यांनी अटक केल्याबद्दल धन्यवाद म्हणत आपली गाडीची चावी आणि बेल्ट पोलिसांच्या हवाली केला.

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांचे नियम आणि कार्यकर्त्यांची ‘मस्ती’! विशेष म्हणजे, या कारवाईच्या एक दिवस आधीच संतोष पंडित यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ताफ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. पडळकरांच्या गाडीला एचएसआरपी नंबर प्लेट नाही, ड्रायव्हरने सीट बेल्ट लावलेला नाही; मग नियम फक्त सामान्य जनतेला दंड लावण्यासाठीच आहेत का? असा सवाल त्यांनी थेट पडळकरांना पाया पडून विचारला होता. त्यावर आमदारांनी त्यांना थेट व्हिडिओ बंद कर असे सुनावले. हा प्रश्न विचारल्यानंतर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी फोन करून आपल्याला आई-बहिणीवरून घाणेरडी शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या, असा व्हिडिओ पुरावाही संतोष पंडित यांनी सोशल मीडियावर जाहीर केला होता. नेत्यांचे नियमभंग कॅमेऱ्यात पकडणाऱ्या आणि प्रशासनाला जाब विचारणाऱ्या सामान्य नागरिकाला मध्यरात्री उचलले जाते, तर दुसऱ्या बाजूला शिवीगाळ करणाऱ्या कार्यकर्त्यांवर काय कारवाई होणार, हाच आता खरा प्रश्न आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!