२३ ऑगस्टला आळंदीत पुरस्कार वितरण पुणे (प्रतिनिधी) — लेखक, कवी, पत्रकार व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते रविराज सोनार यांना केएसआय पब्लिकेशन, कोल्हापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय संत ज्ञानेश्वर माऊली साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आळंदी येथे होणाऱ्या ३० व्या साहित्य संमेलनात रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष व प्रकाशक, कवी सरदार इंगळी यांनी ही माहिती दिली. तसेच केएसआय पब्लिकेशनच्या वतीने लवकरच रविराज सोनार यांच्या कवी कुसुमाग्रजांच्या साहित्याचा वेध घेणाऱ्या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कवी दीपक पवार (रुकडी), लेखक-कवी मातृभक्त आचार्य प्रा. सीए डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी (पुणे), कवी दशरथ धायगुडे (सातारा) यांच्या प्रमुख उपस्थितीत हे साहित्य संमेलन होणार आहे. रविराज सोनार यांना नुकताच वाई येथे आयोजित ५ व्या मिरग नक्षत्र साहित्य संमेलनात छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. मालेगाव मराठी साहित्य संघाच्या वतीने साहित्य प्रवासी पुरस्कार, तसेच सातारा येथे महाराणी ताराबाई सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे. भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कारही त्यांना जाहीर झाला आहे. मूळ मालेगावचे असलेले सोनार सध्या पुणे येथे वास्तव्यास असून पश्चिम महाराष्ट्रातही त्यांनी आपल्या साहित्यसेवेमुळे नावलौकिक मिळवला आहे. लेखक, कवी, समीक्षक व संपादक म्हणून ते परिचित असून गेली ३४ वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता करीत आहेत. कुसुमाग्रजांच्या विशाखातून होणारा जनसंवाद या विषयावर त्यांनी संशोधन केले असून त्यांचा शोधप्रबंध अनेकांना मार्गदर्शक ठरत आहे. ‘मोक्षिणीधारा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहासह अनेक पुस्तके व विशेषांक त्यांनी संपादित केले आहेत. अनेक पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना लिहिली असून पाठराखण (ब्लर्ब लेखन)ही केले आहे. साहित्य, संस्कृती व इतिहास हे त्यांचे आवडीचे विषय असून ते माध्यमतज्ज्ञ म्हणूनही परिचित आहेत. या विषयांवर त्यांची अनेक व्याख्याने झाली आहेत. नाशिक जिल्ह्यासह पुणे येथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत ते सक्रिय आहेत. शिवराय-फुले-आंबेडकर विवेक विचार मंच संस्थापक, शब्दगंध प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मालेगाव मराठी साहित्य संघाचे माजी अध्यक्ष, दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल (पुणे)चे अध्यक्ष, राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष व नाशिक जिल्हा संघटक, प. बा. काकाणी नगर वाचनालयाचे सहकार्यवाह, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे कार्याध्यक्ष तथा प्रमुख कार्यवाह, प्रगतिशील लेखक संघाचे उपाध्यक्ष, तसेच सृष्टी नागरी सहकारी पतसंस्थेचे जनसंपर्क संचालक आदी पदांवर ते कार्यरत आहेत. यापूर्वी सोनार यांना वैष्णव मित्र पुरस्कार, लोकमान्य गौरव पुरस्कार, जनमित्र पुरस्कार, नेहरू युवा गौरव पुरस्कार, कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार, स्व. अनिता जाधव स्मृती पुरस्कार यांसह विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. साहित्य, पत्रकारिता, संशोधन आणि सामाजिक-सांस्कृतिक चळवळीतील त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेत जाहीर झालेल्या या पुरस्कारामुळे मालेगाव तसेच पुणे परिसरातील साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 578 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांचा लातूरमधील तक्रारदारांशी ‘संवाद’ प्रत्येक महामंडळाने कोर्टात का जावे? वेतन फरकासाठी राज्य सरकारकडे एकसमान धोरणाची मागणी