नांदेड (प्रतिनिधी) – नोकरीच्या आमिषाने एका व्यक्तीला बोलावून त्याचे फोटो व व्हिडिओ काढत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा भाग्यनगर पोलिसांनी काही तासांत पर्दाफाश केला. या प्रकरणी तीन महिला व दोन पुरुष अशा पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ₹5.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलै रोजी एका महिलेने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधून ड्रायव्हरच्या कामासाठी बोलावले. त्यानुसार फिर्यादी बेलानगर परिसरात पोहोचल्यावर तेथे उपस्थित आरोपींनी त्याला घरात नेऊन जबरदस्तीने फोटो व व्हिडिओ चित्रीत केले. त्यानंतर हे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. आरोपींनी फिर्यादीच्या हातातील सुमारे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठीही हिसकावून घेतली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने तपास सुरू करून पाचही आरोपींना अटक केली. आरोपींकडून दोन स्कुटी, एक ऑटो, चार मोबाईल फोन व सोन्याची अंगठी असा एकूण ₹5.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर नागरिकांचीही फसवणूक केली आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या मार्गदशनात पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख करीत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या आमिषाला बळी न पडता अशा प्रकारच्या धमक्या किंवा खंडणीच्या प्रयत्नांची तात्काळ पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन नांदेड पोलिसांनी केले आहे.
