बूमवर नाव मोठं, पण पत्रकारिता किती मोठी?
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडमध्ये पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घडलेला पत्रकारांतील वाद हा केवळ दोन-चार पत्रकारांमधील शाब्दिक संघर्ष नव्हता, तर पत्रकारितेच्या बदलत्या संस्कृतीचे विदारक चित्र होते. वातावरण इतके अस्वस्थ झाले की पालकमंत्र्यांनाच माझा वेळ झाला असे सांगत तेथून निघून जावे लागले. प्रश्न एवढाच आहे की, हा प्रसंग पत्रकारितेचा विजय होता की पराभव?
पत्रकार परिषद असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम, प्रत्येक माध्यमाचा प्रतिनिधी बाईट घेण्यासाठी धडपड करत असतो. ही स्पर्धा स्वाभाविक आहे. मात्र स्पर्धा आणि दादागिरी यामध्ये मोठा फरक असतो. एखाद्या वृत्तवाहिनीच्या बूमवर नाव लिहिले आहे म्हणून त्या बूमला आरक्षित हक्क मिळत नाही. बातमी ही कोणाच्या घरची वंशपरंपरागत मालमत्ता नसते. पत्रकारितेत संधी, प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि माहिती मिळवण्याचा हक्क प्रत्येक पत्रकाराला समान असतो.
मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी एकाच नेत्यासमोर शंभरहून अधिक माईक लागतात. तिथे प्रत्येक पत्रकार आपापली जागा शोधतो, पण दुसऱ्याला ढकलून किंवा कमी लेखून स्वतःला मोठे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही. मग नांदेडमध्येच असा मीच मोठा हा आव का?
याहून गंभीर बाब म्हणजे वयाने, अनुभवाने आणि पत्रकारितेतील योगदानाने अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित असताना त्यांच्याशी आदराने वागण्याऐवजी उर्मटपणा दाखवणे. पत्रकारिता ही अहंकाराची नव्हे, तर संयमाची शाळा आहे. आज अनेक अनुभवी पत्रकार दशकानुदशके शांतपणे काम करत आहेत. त्यांच्याकडून शिकण्याऐवजी त्यांनाच धाक दाखवण्याचा प्रयत्न करणे ही मोगलीची स्वतःचीच प्रतिमा खराब करण्याची शर्यत ठरते.
एक जुनी म्हण आहे, रिकाम्या घागरीचा आवाज जास्त. पत्रकारितेतही हे तितकेच लागू होते. आवाज मोठा असला म्हणून वजन वाढत नाही; वजन वाढते ते अभ्यासाने, विश्वासार्हतेने आणि सभ्य वर्तनाने.आमच चॅनेल जात नाही आम्ही लोकांचे चॅनल घालतो अश्या धमक्या मोगली इतरांना देतो.बहूधा फिक्स इट लावलेला असेल पण त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की तोंडात गुटखा भरून बाईट घेणाऱ्यांचे गेलेले चॅनल तू आणि तुझा बाप परत आणू शकले नाहीत हे विसरू नकोस.
एखाद्या पत्रकाराच्या नावामागे त्याचे वडील, त्यांची ओळख किंवा जुनी प्रतिष्ठा असू शकते; पण पत्रकार म्हणून स्वतःची ओळख स्वतःलाच निर्माण करावी लागते. वडिलांचे नाव, जुने संबंध किंवा संस्थेचा ब्रँड हा कायमचा आधार होऊ शकत नाही. अखेर लोक व्यक्तीचे काम पाहतात, आडनाव नाही.
आजच्या सोशल मीडियाच्या युगात एका क्षणाचा व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे एका व्यक्तीच्या वर्तनाचा परिणाम केवळ त्याच्यावर होत नाही, तर तो ज्या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधित्व करतो तिच्या प्रतिमेवरही होतो. पत्रकाराचा प्रत्येक शब्द, प्रत्येक हावभाव आणि प्रत्येक कृती ही त्या संस्थेच्या विश्वासार्हतेशी जोडलेली असते.
शारीरिक ताकद, आवाजातील आक्रमकपणा किंवा धक्काबुक्कीची भाषा ही पत्रकारितेची ओळख नाही,असे कोणीतरी मोगलीला समजून सागा हो. कोण किती किलोचा आहे किंवा कोणाला कोण खाली पाडू शकतो, अशा चर्चा पत्रकारितेला शोभणाऱ्या नाहीत. पत्रकाराचा खरा वजनदारपणा त्याच्या प्रश्नांत, तथ्यांमध्ये आणि जनतेच्या विश्वासात असतो. बाकी सर्व क्षणिक असते.
पत्रकारितेचा मूलमंत्र साधाच आहे आधी आदर द्या, मग आदर मिळवा. दुसऱ्याला संधी नाकारणारा पत्रकार उद्या स्वतः संधीपासून वंचित राहू शकतो. स्पर्धा असावी, पण ती गुणवत्तेची असावी; संघर्ष असावा, पण तो सत्यासाठी असावा; प्रसिद्धी मिळवायची असेल तर ती कामातून मिळवावी, दादागिरीतून नव्हे.
नांदेडमधील हा प्रसंग सर्व पत्रकारांसाठी आत्मपरीक्षणाची संधी आहे. माईकवरील लोगो मोठा असण्यापेक्षा नावामागील विश्वास मोठा असतो. कारण शेवटी जनता बूमवरील स्टिकर पाहून नाही, तर पत्रकारितेतील प्रामाणिकपणा पाहून पत्रकाराचा सन्मान करते. पत्रकारितेचा वारसा कुणालाही मिळू शकतो; पण पत्रकारितेची प्रतिष्ठा मात्र रोजच्या वागण्यातून आणि कामातूनच कमवावी लागते.मोगली आता तरी सुधर नाही तर पाणबुडी होईल याचा काही नेम नाही.
