नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत प्रेगा गॅबलीन (Pregabalin) या प्रतिबंधित औषधाच्या ११० गोळ्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख २ हजार ७१७ रुपये इतकी आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २०५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपींकडून प्रेगा गॅबलीन कॅप्सूलचे ११ पाकिटे, एकूण ११० गोळ्या जप्त करण्यात आल्या. या गोळ्यांची किंमत २,७१७ रुपये असून, त्यांच्याकडील बोलेरो पिकअप (MH-26 CH-3876) ही सुमारे १२ लाख रुपये किमतीची गाडीही जप्त करण्यात आली. या प्रकरणात राजनेश उत्तम खंदारे (वय ३८), अदित गणेश गिरी (वय २३), बुद्धभूषण गणेश हटकर (वय २९) आणि दिगंबर गणेश कपाळे (वय २१) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये आणखी आरोपी किंवा प्रतिबंधित गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सांडुके तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित औषधे, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,227 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; २४ लाखांचे चोरीचे सोने जप्त, दोन महिलांना अटक नांदेडमध्ये घरफोडी व बसप्रवासादरम्यान दागिने चोरी; दोन गुन्हे दाखल