दाभड (प्रतिनिधी) – तब्बल दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या दाभड–मेढाला शिवार रस्त्याच्या प्रश्नाला अखेर मार्ग मिळण्यास सुरुवात झाली आहे. सत्य गणपती मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या या महत्त्वाच्या पांदण रस्त्याच्या कामास प्रशासनाच्या पुढाकारातून प्रारंभ झाल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जांभुळन, वांडेपूर, दाभड व मेंढला परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा रस्ता जीवनवाहिनी मानला जातो. विशेष म्हणजे या मार्गालगत असलेल्या प्रसिद्ध सत्य गणपती मंदिरात वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी ये-जा करतात. त्यामुळे हा रस्ता केवळ शेतीपुरता मर्यादित नसून सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यासाठी गेल्या सुमारे २० वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी रामचंद्र उर्फ मनोज माणिकराव मनपुर्वे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी महसूल प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन हा विषय लावून धरला होता. प्राप्त माहितीनुसार, अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर, नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे तसेच मंडळ अधिकारी इंगळे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतिमान केली. त्यांच्या पुढाकारामुळे संबंधित पक्षकारांना नोटिसा बजावून प्रत्यक्ष जागेवर सुनावणी घेण्यात आली आणि रस्ता खुला करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यापूर्वी अर्जदारांनी दाभड येथील गट क्रमांक २७०, २७१ व २७२ तसेच मेढाला परिसरातील शेतजमिनींकडे जाण्यासाठी स्वतंत्र शिवार रस्ता उपलब्ध नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर महसूल विभागाने सर्व संबंधित पक्षांचे म्हणणे ऐकून, अभिलेखांची पडताळणी करून आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत हा मार्ग मोकळा करण्याची कार्यवाही सुरू केली. या संपूर्ण प्रक्रियेत महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर होण्यास मदत होणार असून सत्य गणपती मंदिराकडे येणाऱ्या भाविकांच्या वाहतुकीलाही अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.वीस वर्षांच्या संघर्षानंतर विकासाचा हा मार्ग खुला होत असल्याने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या या सकारात्मक पावलाचे स्वागत केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 839 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दोन महिन्यांपूर्वी खून करून गाडलेले प्रेत मरखेल पोलिसांनी शोधले दैनंदिन जीवनात योगाभ्यास महत्त्वाचा- जी.एस. ढवळे