नांदेड़ (प्रतिनिधी)- कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच जर गुंडगिरी करत असतील तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचे, असा संतप्त सवाल आता अर्धापूर तालुक्यातून उपस्थित होत आहे. मालेगाव येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत हिंगोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांनी शेतात काम करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. माहितीनुसार, मालेगाव येथील गट क्रमांक १५७ मधील शेतात हळदीसाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेड तयार करण्याचे काम सुरू होते. याचवेळी आरोपी रेवन उर्फ अर्जुन सिद्धेश्वर स्वामी, जो हिंगोली जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहे, त्याच्यासह रघुनाथ सिद्धेश्वर स्वामी, सिद्धेश्वर नागनाथ स्वामी आणि एका महिलेनं शेतात येत काम थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर वादाला अचानक हिंसक वळण लागले. फिर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करत आरोपी रेवन स्वामी याने तिचा हात पकडून ओढणी खेचली व तिला जमिनीवर पाडून विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता दुसरा आरोपी रघुनाथ स्वामी यानेही महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलेला वाचवण्यासाठी धावून आलेल्या तिच्या पतीवर लोखंडी कड्याने तोंड व मानेवर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत त्यांचा एक दात पडला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच फिर्यादीच्या दीर व सासूलाही लाथाबुक्क्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकारातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याची उघड धमकी. मी पोलीस आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही, तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवतो, अशी दमदाटी आरोपीने केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यामुळे खाकी वर्दीच्या आड दादागिरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी अर्धापुर पोलिस ठाण्यात आरोपी रेवन उर्फ अर्जुन सिद्धेश्वर स्वामी, रघुनाथ सिद्धेश्वर स्वामी, सिद्धेश्वर नागनाथ स्वामी आणि एका महिलेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुपंत कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी चाटे पुढील तपास करत आहेत.या प्रकरणात पोलिसांची तक्रार घेवून दुसऱ्या गटा विरुद्ध सुद्धा गुन्हा दखल झाला आहे. मारहाणीचा व्हिडिओ …. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/05/WhatsApp-Video-2026-05-29-at-06.15.22.mp4 Kanthak Suryatal Post Views: 922 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एसआयआर म्हणजे आधी फाशी, मग चौकशी असा प्रकार गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा