नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या एप्रिल महिन्यातील कामगिरीच्या मूल्यमापनात सोनखेड पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. विविध निकषांवर आधारित करण्यात आलेल्या या मूल्यांकनात सोनखेड पोलीस ठाण्याला ६६.७ गुण मिळाले असून नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे पोलीस विभागात सोनखेड पोलीस ठाण्याच्या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस ठाण्यांच्या गुन्हे उघडकीस आणणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा, प्रतिबंधात्मक कारवाई, नागरिकांशी समन्वय, तसेच विविध मोहिमांमधील सहभाग या निकषांवर हे मूल्यमापन करण्यात आले. सोनखेड पोलीस ठाण्याने सर्वच बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक कायम राखला आहे. या यादीत नांदेड जिल्ह्यातील उमरानगर पोलीस ठाणे ६२.१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले, तर हिंगोली जिल्ह्यातील बासंबा पोलीस ठाण्याने ६१.९ गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्यानंतर कुरुंदा, सेनगाव, कुंडलवाडी, औंढा नागनाथ, मनाठा, वसमत ग्रामीण, सिद्धखेड, गांधी चौक, वसमत शहर आणि हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो. सोनखेड पोलीस ठाण्याने मागील काही महिन्यांपासून सातत्यपूर्ण कामगिरी कायम ठेवली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संघटितपणे काम केल्याचे दिसून आले. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, अवैध धंद्यांवर कारवाई, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीसांनी घेतलेल्या पुढाकाराचेही कौतुक होत आहे. दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून पुढील महिन्यांतही अशीच कामगिरी कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,235 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जागतिक परिचारिका दिन ग्रामीण रुग्णालय येथे साजरा विश्वगुरूचा महान डोलारा आणि नेपाळचा छोटा आरसा