खंडणीचा आरोपी कोर्टात, शोध मात्र कागदावर’! — एक उपरोधिक वास्तव
नांदेड (प्रतिनिधी) — कायद्याच्या अंमलबजावणीची कमाल बघायची असेल, तर सध्या नांदेडच्या न्यायालय परिसरात एक फेरफटका मारला तरी पुरे! कारण खंडणी प्रकरणातील फरार आरोपी शेख याहिया शेख इसाक हा जणू लपाछपीचा खेळ खेळत नसून, सरळपणे न्यायालय परिसरात वावरत असल्याची चित्रे उपलब्ध झाली आहेत.
एकीकडे न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून पोलीस कोठडीतील तपास आवश्यक असल्याचे स्पष्ट सांगितले, तर दुसरीकडे संबंधित आरोपी मोकळ्या हवेत फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणजे न्यायालयाचे आदेश एका बाजूला आणि प्रत्यक्ष परिस्थिती दुसऱ्याच बाजूला कायद्यालाच जणू गोंधळून टाकणारी ही किमया! सगळ्या कथेत सर्वात रंजक भाग म्हणजे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरीक्षक प्रविण आगलावे. त्यांच्या नावावर सोशल मीडियावर टीकेची बरसात सुरू आहे. कारण काय? तर गुटखा प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत! पण त्याचवेळी खंडणीचा फरार आरोपी न्यायालयात हजेरी लावत असल्याकडे मात्र टीकाकारांचे लक्ष जात नाही, हे विशेष!
प्रविण आगलावे यांच्याकडे ना मोठी फौज, ना अत्याधुनिक साधनं स्वतःची दुचाकी आणि एकच सहकारी एवढ्यावरच ते कर्तव्य बजावत आहेत. तरीही त्यांच्यावर शिकवणी घेणाऱ्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतेय. जणू काही प्रत्येक जण पोलीस कार्यपद्धतीचा तज्ज्ञच! दरम्यान, इतवारा पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाचीही चर्चा रंगली आहे. तब्बल १३ अंमलदार असलेले हे पथक आणि त्यांचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक डॉ. परमेश्र्वर ठानुसिंग चव्हाण ज्यांच्या नावापुढे शस्त्रक्रियेत तज्ज्ञ अशी प्रतिमा तयार झाली आहे हे पथकही या फरार आरोपीच्या शोधात अतिशय व्यस्त असल्याचे दिसते. इतके व्यस्त की, शहरातच फिरणारा आरोपी सापडत नाही!
म्हणजे पूर्वी मुंबई, गुजरात, कर्नाटकपर्यंत आरोपी शोधून काढणारे हेच पथक प्रमुख आता नांदेडच्या रस्त्यांवर हरवले आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. सगळ्या प्रकारात खरी गंमत म्हणजे आरोपी कोर्टात, पोलीस शोधात आणि सोशल मीडियावर चर्चा जोरात! आता पाहायचे एवढेच की, हा सार्वजनिक रहस्य असलेला फरार आरोपी अखेर कोणाच्या हाती लागतो प्रविण आगलावे यांच्या, की अजून कोणाच्या? तोपर्यंत मात्र नांदेडकरांनी हा थरारक खेळ पाहत राहायचा..कारण इथे वास्तवच कधी कधी व्यंगचित्रापेक्षा जास्त विनोदी वाटतं
संबंधित बातमी ….
नगरसेवकाला खंडणी मागणाऱ्या युटूबर पत्रकार शेख याहियाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
