नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरात आज सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. अचानक जमिनीला हलकासा कंप जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरातील जुन्या नांदेड परिसरापासून ते तरोडा भागापर्यंत अनेक नागरिकांनी हे धक्के जाणवल्याचे सांगितले. काही ठिकाणी घरातील भांडी हलणे, पंखे डुलणे तसेच इमारतींमध्ये सौम्य कंप जाणवला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नांदेड शहरासोबतच अर्धापूर तालुक्यात भूकंपाची तीव्रता तुलनेने अधिक जाणवल्याची चर्चा आहे. अर्धापूर परिसरातील नागरिकांनी काही सेकंद जमीन हलल्याचा अनुभव व्यक्त केला. तसेच पूर्णा आणि हिंगोली जिल्ह्यातील काही भागांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. या घटनेमुळे नागरिक घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी थांबल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये बसविण्यात आलेल्या भूकंप मापक यंत्रावर या भूकंपाची नोंद झाली असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित यंत्रणेमार्फत भूकंपाची तीव्रता आणि त्याचा केंद्रबिंदू याबाबत अधिकृत माहिती संकलित केली जात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असल्याने कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप प्राप्त झालेले नाही. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यास त्वरित घराबाहेर पडून मोकळ्या जागेत जाणे, उंच इमारती, वीज तारा आणि धोकादायक वस्तूं पासून दूर राहणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.भूकंप हा नैसर्गिक प्रकार असला तरी सतर्कता आणि योग्य खबरदारी घेतल्यास संभाव्य धोके टाळता येतात. त्यामुळे नागरिकांनी शांतता राखून सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचे केंद्र अकोल्याच्या दक्षिण दिशेस सुमारे १३१ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूकंप मापक यंत्राच्या नोंदीवरून समोर आली आहे. संबंधित अहवालानुसार हा भूकंप जमिनीखाली अंदाजे १० किलोमीटर खोलीवर निर्माण झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते. अधिकृत यंत्रणांकडून पुढील तपशील संकलित करण्याचे काम सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. Kanthak Suryatal Post Views: 2,686 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भाग्यनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गजाजन किडे मुख्यालयात जमा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे की लोकशाही टिकवणे? आंबेडकरांचा हा संदेश आज पुन्हा नव्याने स्मरणात ठेवण्याची गरज आहे