जुन्या मालकांना निरोप आणि नव्या मालकांची निवड

माहूर दत्त संस्थानात नव्या महंत पदी धनेश्वर भारती; वैकुंठवासी महंत मधुसूदन भारतींना भावपूर्ण श्रद्धांजली

नांदेड (प्रतिनिधी)- माहूरच्या पवित्र दत्त संस्थानात अध्यात्म, परंपरा आणि भक्तिभावाचा संगम अनुभवायला मिळाला. दत्त शिखराच्या गादीवर नव्या महंतांची निवड ईश्वर चिठ्ठी या पारंपरिक पद्धतीने करण्यात आली असून धनेश्वर भारती उर्फ श्याम भारती यांची महंत म्हणून निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमुळे माहूर तीर्थक्षेत्रात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दत्त संस्थानातील प्राचीन परंपरेनुसार पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून पाच साधुसंतांची नावे संकलित करण्यात येतात आणि त्यातून ईश्वर चिठ्ठीद्वारे महंतांची निवड केली जाते. लोकशाही सदृश आणि श्रद्धेवर आधारित या परंपरेत तीन वेळा काढलेल्या चिठ्ठ्यांमध्ये धनेश्वर भारती उर्फ श्याम भारती यांचेच नाव पुढे आल्याने त्यांची निवड निश्चित झाली.

आज रोजी त्यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली. पुढील धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा पट्टाभिषेक सोहळा पार पडणार असून त्या वेळी त्यांचे आध्यात्मिक नाव धनेश्वर भारती गुरु मधुसूदन भारती असे घोषित केले जाणार आहे.

दरम्यान, दत्त संस्थानाचे वैकुंठवासी महंत मधुसूदन भारती महाराज यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. वयाच्या ९५व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. सन १९७८ पासून ते २०२६ पर्यंत जवळपास ४८ वर्षे त्यांनी दत्त शिखराची अखंड सेवा केली. त्यांच्या कार्यकाळात संस्थानाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे झाली. शासनाच्या वतीने संस्थानचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी नायब तहसीलदार पदाची नियुक्तीही त्यांच्या काळात करण्यात आली.

महंत मधुसूदन भारती यांच्या अंतिम दर्शनासाठी पर राज्य आणि राज्यभरातून हजारो भाविक माहूर येथे दाखल झाले होते. प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाने केलेल्या योग्य नियोजनामुळे भाविकांना शांततेत दर्शन घेता आले. सायंकाळपर्यंत अत्यंत दिमाखदार आणि धार्मिक विधींसह त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वास्तव न्यूज लाईव्ह परिवाराच्या वतीने वैकुंठवासी महंत मधुसूदन भारती महाराजांना विनम्र अभिवादन तसेच नव्याने निवड झालेले महंत धनेश्वर भारती उर्फ श्याम भारती यांना हार्दिक शुभेच्छा !

दत्त शिखरच्या ३० महंतांची यादी …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!