नांदेड (प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या 36 तासांत अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या जलद कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
या प्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 32/2026 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 74, 75, 76 तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून 21 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.01 वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी जून 2025 पासून शिक्षणासाठी बाहेर जात असताना आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून वेळोवेळी अश्लील वर्तन केले. 21 मार्च 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने मुलीच्या घरी जाऊन तिला व तिच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी नरेश बंजरंगराव जाधव (वय 25 रा. जि. नांदेड) याला 21 मार्च रोजी रात्री 11.04 वाजता अटक करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस अंमलदार व्यंकट धोंगडे,रघुवीर चौहाण,शिवराज गंगुलवार,पैरवी अधिकारी आनंदराव सावरगावे यांनी पूर्ण केली. या प्रकरणात जलद तपास करून आरोपीला अटक केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुंडलवाडी पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
