नवीन नांदेड (प्रतिनिधी) - गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सुमारे 16 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7.40 वाजता विष्णुपुरी शिवारातील, गोदावरी नदीपात्र परिसरात करण्यात आली.
याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 147/2026 अंतर्गत भादंवि कलम 303(2), 3(5), महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48(7), 48(8) तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 मधील कलम 9, 15 व सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एक ब्रास वाळू (अंदाजे किंमत 25,000 रुपये), दोन ट्रॅक्टर (प्रत्येकी सुमारे 3.50 लाख रुपये), एक जेसीबी मशीन (सुमारे 10 लाख रुपये) व एक लोखंडी छोटी बोट (अंदाजे 1 लाख रुपये) असा एकूण 16 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर,पोलीस अंमलदार पांचाळ,असिफ,कांबळे यानी सर्व साहित्य जप्त करून वाळू माफिया गजानन हंबर्डे आणि एका अज्ञात माणसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेल्या साहित्यापैकी पाच ब्रास वाळू वगळता सर्व साहित्य तोडून जाळण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस करत असून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
संबंधित व्हिडीओ ..
