आजच्या परिस्थितीत सोने आणि चांदी यांच्या दरात जी वाढ अपेक्षित होती, ती झालेली आहे. आता या संदर्भात अत्यंत सांभाळून विचार करण्याची गरज आहे. अन्यथा, पुन्हा दर वाढतील या आशेने पुढे जाणे निश्चितच धोकादायक ठरू शकते. कारण कोणत्याही वस्तूचा बाजारभाव हा मागणी, पुरवठा आणि उपलब्धता यांवर अवलंबून असतो. हेच तत्त्व सोन्यालाही आणि चांदीलाही लागू होते. या दोन्ही धातूंनी ज्या उच्चांकापर्यंत पोहोचायचे होते, तो टप्पा आता गाठलेला आहे. हे एका उदाहरणातून समजून घेता येईल. समजा एखाद्या इमारतीला आग लागली आहे. त्या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी एक आपत्कालीन दरवाजा असतो. पण जर त्या दरवाज्यावर प्रचंड गर्दी झाली, तर सर्वांना सुरक्षितपणे बाहेर पडता येईल का? याचे उत्तर स्पष्टपणे ‘नाही’ असेच आहे. त्याचप्रमाणे सोने आणि चांदीचे दरही आज त्या टप्प्यावर पोहोचले आहेत, जिथे धोका निर्माण होण्याची वेळ जवळ आली आहे.
आग लागल्यानंतर बचाव कसा करायचा याचा विचार करण्याऐवजी, आग लागण्याआधीच सावध राहणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या आयुष्याची संपूर्ण कमाई आपण यात गमावून बसू शकतो. मागील काही महिन्यांपूर्वी आम्ही सांगितले होते की सोने आणि चांदीचे दर वाढणार आहेत. आता मात्र आम्ही सांगत आहोत की हे वाढलेले दर का आणि कसे थांबू शकतात. सध्या चांदीचे स्वतंत्र उत्पादन फारसे होत नाही. बहुतांश वेळा तांब्याच्या उत्पादनातून चांदी हे उपउत्पादन म्हणून मिळते. मात्र आता चांदी इतक्या उच्च पातळीवर पोहोचली आहे की ती साठवून ठेवण्याची क्षमता फारच थोड्या लोकांकडे उरली आहे.
उदाहरणार्थ, सोलार उद्योगात चांदीचा वापर होतो. सोलार पॅनलमध्ये साधारणतः ५ टक्के चांदी असते. म्हणजेच एक लाख रुपयांच्या सोलार पॅनलमध्ये सुमारे पाच हजार रुपयांची चांदी असते. आता चांदीच्या किमतींमध्ये जवळपास ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. जेव्हा एखादी वस्तू महाग होते आणि ग्राहकांच्या खरेदी क्षमतेबाहेर जाते, तेव्हा तिची मागणी कमी होते. हेच सध्या चांदीच्या बाबतीत घडताना दिसत आहे. इतकेच नव्हे, तर उद्योगांमध्ये पर्यायही शोधले जात आहेत. जसे तांबे महाग झाल्यावर एसी उत्पादक कंपन्यांनी तांब्याच्या तारांऐवजी इतर पर्यायांचा वापर सुरू केला, तसेच चांदीच्या बाबतीतही होत आहे. परिणामी, उद्योगांमधील चांदीची मागणी कमी झाली आहे. दागिन्यांच्या बाबतीत तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. सध्या चांदीच्या दागिन्यांची मागणी २२ ते ३० टक्क्यांनी घटलेली आहे.
चीनमध्ये चांदीची ट्रेडिंग करणारी ‘JWR’ नावाची कंपनी असून, तिथे सुमारे १.४ अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक अडकलेली आहे. आजकाल सोने-चांदीच्या इंडेक्समध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते, जिथे प्रत्यक्षात धातूची देवाणघेवाण न होता केवळ कागदावर व्यवहार होतात. म्हणजेच प्रत्यक्ष चांदी किंवा सोने घेतले किंवा दिले जात नाही, फक्त दरांवरच खेळ चालतो. जेव्हा दर अशा पद्धतीने झपाट्याने वाढतात, तेव्हा गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण होते की अचानक बाजार कोसळला, तर मोठे नुकसान होईल. त्यामुळे ते विक्रीची संधी शोधू लागतात. ‘JWR’ कडे प्रत्यक्ष सोने किंवा चांदी नव्हती, पण तरीही लोक पैसे किंवा धातू मागू लागले. परिणामी, आज त्या कंपनीला वाचवण्यासाठी चीनमध्ये पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
आज बाजारात खरेदी-विक्रीसाठी प्रचंड वेगाने काम करणारी सॉफ्टवेअर्स आणि संगणक प्रणाली कार्यरत आहेत. ठरावीक दर आला की आपोआप खरेदी किंवा विक्री करण्याचे आदेश त्यांना दिलेले असतात. हे व्यवहार सर्वसामान्य माणसाच्या गतीपेक्षा कितीतरी पटीने वेगाने होतात. जगातील अनेक केंद्रीय बँकांनी याआधी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करून साठवले होते. आता मात्र त्यांच्या खरेदीचा वेग कमी झाला आहे. म्हणजेच त्यांनी जेवढे सोने खरेदी करायचे होते, ते जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे इथेही मागणी कमी होताना दिसते.
सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीत विचार केला तर, वाढलेल्या किमतींमुळे खरेदी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. भारतात सध्या केवळ सुमारे २० टक्के दागिन्यांची मागणी उरलेली आहे. म्हणजे सोन्याची उपलब्धता आहे, पण मागणी नाही. अशा परिस्थितीत दर खाली येण्याची शक्यता अधिक असते. आजही काही प्रमाणात मागणी आहे, पण ती मुख्यतः कागदी व्यवहारांपुरती मर्यादित आहे बॉण्ड्स, कागदी खरेदी-विक्री आणि इतर वित्तीय साधनांद्वारे. प्रत्यक्षात किती सोने खरेदी करून साठवले जाते, याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
एकंदरीत पाहता, सोने आणि चांदीच्या दरांची कमाल मर्यादा आता गाठलेली आहे. व्यापारी असोत किंवा ग्राहक, कोणीही या वाढलेल्या दरांचा भार सहन करू शकत नाही. मागणी कमी होत असतानाही दर वाढत असतील, तर त्यामागे काही वेगळाच खेळ सुरू आहे, हे स्पष्ट होते.सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की, जर हे दर सध्याच्या पातळीवरून घसरायला लागले, तर त्या अरुंद ‘बचावाच्या दरवाज्यातून’ बाहेर पडणे सर्वसामान्य माणसासाठी निश्चितच अत्यंत कठीण ठरणार आहे.
