नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने नांदेड व लातूर जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सलग छापे टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत साडेतीन लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम, 39 मोबाईल, एक गावठी अग्निशस्त्र व तीन जिवंत काडतुसे असा एकूण 8 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 27 जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड यांच्यासह पाच पोलीस अंमलदारांना लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाईक चौक परिसरात असलेल्या रमेश गिरी यांच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या छाप्यात 1 लाख 5 हजार 200 रुपये रोख रक्कम व 70 हजार रुपये किमतीचे 12 मोबाईल असा एकूण 1 लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 41/2026 दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर 30 जानेवारी रोजी याच पथकाने नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मच्छी मार्केट परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या 25 व्यक्तींंकडून 2 लाख 34 हजार 100 रुपये रोख रक्कम तसेच 4 लाख 28 हजार रुपये किमतीचे 27 मोबाईल असा एकूण 6 लाख 62 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 32/2026 नोंदवण्यात आला असून 25 आरोपींची नावे त्यात समाविष्ट आहेत.

याच कारवाईदरम्यान उल्हासनगर, तरोडा नाका येथील जयकिशन ऊर्फ जय राजेश सिंह ठाकूर (वय 21) याच्याकडून एक गावठी अग्निशस्त्र व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या शस्त्रांची अंदाजे किंमत 31 हजार 500 रुपये असून या प्रकरणीही इतवारा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा क्रमांक 31/2026 दाखल करण्यात आला आहे. नांदेडमध्ये पकडलेल्या जुगाऱ्यांची नावे इब्राहिम खान मुर्तुजा खान, हरप्रीत सिंग रणजीत सिंग, शेख अल्ताफ शेख सलीम, अब्दुल मोबीन कुरेशी अब्दुल नबी कुरेशी, विकी अशोक हातवळणे, हुसेन खान रशीद खान, शेख सुफियान शेख अयुब, फिरोज खान वाहेद खान पठाण, अब्दुल मुबशीर अब्दुल मुजी,सय्यद रहीम सय्यद हबीब, वाजीद बेग नासर बेग, शेख इरफान शेख अमीर, शेख मोहसीन शेख मीरा साहब, अब्दुल सलाम अब्दुल रज्जाक, मनदीप सिंग गुरमीत सिंग पट्टे, अब्दुल बारी अब्दुल रजाक, मुकेश चंदन जोगदंड, सौरभ संजय सुखणीकर, सद्दाम हुसेन मोहम्मद अमीन, सय्यद सरवर सय्यद इब्राहिम, विक्रम नंदलाल रौत्रे, विक्रम सुरेश दळवे, शेख फिरोज शेख जिलानी, रसबीर सिंग बलबीर सिंग बेंगलोरवाले अशी आहेत
या दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवायांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी व विलास सुरवसे यांनी सक्रिय सहभाग घेतला.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी संबंधित पथकास 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपल्या परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास, पोलीस उपनिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in संकेतस्थळावर किंवा ‘खबर’ हेल्पलाइनवर अर्थात मोबाईल क्रमांक 9150100100 वर माहिती देऊन अवैध धंद्यांच्या निर्मूलनासाठी सहकार्य करावे.
