नांदेड – प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन येथे रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त परिसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनुश्री केंद्रे, मोटार वाहन निरीक्षक हेमंत साळुंखे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रेणुका राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व, प्रशासकीय जबाबदाऱ्या तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत सखोल माहिती देण्यात आली. रस्ता सुरक्षा, नागरिकांशी संवाद, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रामाणिक प्रशासन यांचे महत्त्व अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. तसेच स्पर्धा परीक्षा, प्रत्यक्ष कामातील अनुभव आणि भविष्यातील करिअर संधी यावरही विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एल. कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. बैठक व्यवस्था प्रा. एस. जी. अन्नमवाड यांनी केली, तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. बी. बी. कपूर यांनी केले. कार्यक्रमात अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या क्विझ स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना आरटीओ कार्यालयाकडून मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाच्या वतीने मार्गदर्शक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
