नांदेड (प्रतिनिधी) – मुलीशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी इलियास अहमद इकबाल अहमद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ९ मे २०२५ ते १५ जून २०२५ या कालावधीत पीर बुऱ्हाण नगर येथे राहणारे एजाज अहमद, आसमा बेगम, अब्रारार अहमद आणि अली अहमद यांनी संगनमत करून त्यांच्या मुलीसोबत लग्न करतो, असा विश्वास निर्माण केला. या विश्वासावर फिर्यादीकडून ५० लाख रुपये रोख रक्कम तसेच सुमारे १० लाख रुपयांचे फर्निचर साहित्य घेतले. मात्र, लग्न न करता आर्थिक घोळ घालून फिर्यादीची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा क्रमांक १०/२०२६ दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींची भूमिका आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू आहे.
