नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील वजीराबाद परिसरात तसेच नायगाव येथे चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही प्रकरणांत घटनांनंतर उशिराने तक्रारी दाखल झाल्याचेही समोर आले आहे.
वजीराबाद भागातील पारशी अंजुमन लेन येथे असलेल्या पाटील डेअरी अँड बेकरी येथे चोरीची घटना घडली. या प्रकरणी दुकानाचे मालक पांडुरंग सखाराम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ४ जानेवारी रोजी रात्री १०.३० ते ५ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरला वाकवून करून आत प्रवेश केला. गल्ल्यातील ५२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेण्यात आली. ही घटना ५ जानेवारी रोजी उघडकीस आली असली, तरी तक्रार मात्र ९ जानेवारी रोजी दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा क्रमांक 17/2026 दाखल केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार माधव नागरगोजे करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत नायगाव तहसील कार्यालयाजवळील विद्युत उपकेंद्र परिसरातून महावितरण कंपनीचे ३५ लोखंडी पोल चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. दिनांक १० डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत मोकळ्या जागेत ठेवलेले सुमारे ३ लाख १५ हजार रुपये किमतीचे लोखंडी साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याबाबत ऋषिकेश रामराव देशपांडे या खाजगी माणसाने दिलेल्या तक्रारीनंतर नायगाव पोलिसांनी गुन्हा क्रमांक 06/2026 दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार साई सांगवीकर करीत आहेत.या सलग चोरीच्या घटनांमुळे शहर व नांदेड जिल्हा परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.
