वृत्तपत्रांचा प्रवास…आजपर्यंतचा !

बदलत्या काळासोबत ज्याला बदलणे जमले त्यालाचा यश प्राप्त करणे सोपे असते. याचा व्यक्तीप्रमाणे माध्यम क्षेत्राचा विस्तार आणि आजची स्थिती याचं एक चिंतन आणि येणाऱ्या काळातील बदलाचा वेध आणि याचं निमित्त अर्थात दर्पण दिन.

सिंधुदूर्ग जिल्ह्यात जन्म झालेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा कार्यालेख खरोखरच अफाट आहे. मराठी माणसांनी जन्म दिलेल्या दोन व्यवसायांनी नंतर उत्तुंग अशी भरारी घेतली. यात दर्पणकार जांभेकर यांनी मुहूर्तमेढ केल्यानंतर वृत्तपत्र व्यवसाय एक आहे. सोबत स्मरण करावे असा व्यवसाय म्हणजे दादासाहेब फाळके यांनी सुरू केलेला चित्रपट व्यवसाय याचीही आठवण आपण ठेवली पाहिजे.

या दोन्ही व्यवसायांवर आज लाखो कुटूंबे अवलंबून आहेत. इतकेच नव्हे तर देशाला दिशा आणि नेतृत्व देणारी व्यक्तीमत्वे ही याचा मधून आपणासमोर आली आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी, संविधान देशाला देणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच देशाचे पंतप्रधान राहिलेले दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आरंभिक काळात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती.

कधी काळी केवळ मुद्रीत माध्यम आणि त्यासोबत रेडिओ हे माध्यम होते त्यातही रेडिओवर शासकीय नियंत्रण असलेला काळ होता त्यामुळे मुद्रीत माध्यमाला अधिक महत्व होते. नंतरच्या काळात टेलीव्हिजन चॅनेलचा प्रारंभ झाला त्यातही अनेक वर्षे देशात शासन यंत्रणेची माध्यमे म्हणून त्याकडे बघितले जात होते. त्याकाळातही मुद्रीत माध्यमाचे महत्व कायम राहिले.

नंतर 90 च्या दशकात वाहिन्यांची सुरूवात झाली. आज आपण याचा प्रवास बघितला तर तो थक्क करणारा असा आहे. आजच्या तारखेस देशात सर्व भाषांची मिळून 1150 चॅनेल्स आहेत आणि यातील केवळ वृत्तप्रधान वाहिन्यांची संख्या 433 इतकी आहे. एकूण चॅनेल संख्येच्या 40 टक्के असे प्रमाण होते. यात सर्वाधिक 211 वाहिन्या हिंदी भाषी असून मराठी वृत्तवाहिन्यांची संख्या 14 आहे. वाहिन्यांची संख्या वाढली त्यानंतर नवमाध्यमांचा उदय झाला असे असले तरी आजही मुद्रीत माध्यमाला असणार माध्यम महत्व आजही तितकेच आणि कारण आपल्या देशात आजही ‘लिहिलेल्या आणि छापलेल्या’ शब्दांवर’  सर्वांचा विश्वास आहे.

मुद्रीत माध्यमे संपणार अशी ओरड सुरू झाली, मात्र त्यानंतरही आजवर या माध्यमांचा विस्तार सुरूच आहे. एक पिढी वयात येताना दुसरी पिढी जन्म घेतेय अशा आपल्या विस्तीर्ण आसेतू हिमालय अशा भारत देशात नवे वृत्तपत्र दाखल होते. त्यावेळी ते आधीच्या वृत्तपत्रांवर फारसा परिणाम करत नाही याचं कारण म्हणजे प्रत्येक वृत्तपत्र आपला नवा वाचकवर्ग घेऊन येतो.

मात्र नवमाध्यमांनी सर्वांना बदलणे आवश्यक आहे असा स्पष्ट संदेश दिला आहे. यानुसार बड्या वृत्तपत्रांनी आपल्या ऑनलाईन आवृत्त्या सुरू केल्या आहेत. त्यातूनही व्यवसाय वृद्धी होईल असा होरा बांधून त्याची ऑनलाईन वर्गणी भरून वर्गणीदार केले जात आहेत असे सध्याचे चित्र आहे. मात्र झपाट्याने माहिती समोर आणणाऱ्या या काळात सशुल्क ऑनलाईन वृत्तपत्र विक्री त्यांना यापुढील काळात प्राप्त होईल याची खात्री नाही. वृत्तपत्राला त्याच्या ऑनलाईन उपस्थिती ती देखील मोफत ठेवून त्याच्या आधारे डिजिटल मार्केटींग मधून व्यवसाय हा उत्तम पर्याय आहे. हे ज्यांना कळले त्यांचे भविष्य दोन्ही बाजूंनी चांगले राहणार आहे.

कोणत्याही तंत्राचे फायदे जसे असतात तसे तोटेही असतात. नवमाध्यमे वापरताना त्यात अनेक जण विविध पद्धतीने वापरतात यामुळे युट्यूब चॅनेलचे पेव आलेले आपणास दिसते. याला नेमके अधिष्ठान नाही. परिणामी या माध्यमांचा मुळ प्रवाहात प्रवेश होणे अवघड आहे. त्यांना मान्यता मिळण्याची शक्यता सध्या नाही आणि भविष्यात ती झाली तरी त्यावर नियंत्रण ही समस्या ठरू शकते.

इन्स्टाग्राम आणि फेसबूक व (ट्विटर )आताचे एक्स या माध्यमांचा वापर वेगळा हेतू,वेगळा आणि गती देखील वेगळीच आहे. त्यात क्षणभंगूरता अधिक प्रमाणात आहे. त्यात ‘एन्फ्ल्युएन्सर’ होण्याचे भाग माध्यमांना अशक्य असे आहे. कधी काळी Mission with Vision असणारी पत्रकारीता व्यावसायिक स्पर्धेने पूर्णपणे बदलून टाकली आणि ग्रामीण भागात याचे चित्र अगदीच वेगळे झालेले आहे. यातील व्यावसायिक भाग सोडला तर आजही ही वृत्तपत्रे एका अर्थाने समाजाला मार्ग दाखवण्याचे काम करीत आहे.

आपल्या देशात 3 स्तंभ अर्थात सेना, न्यायालय आणि शासन यंत्रणा यांना मान्यता आहे. माध्यमांनी यात ‘समाज प्रहरी’ म्हणून आपले स्थान चौथा स्तंभ स्वरूपात उभे केले आहे. त्याचाही गौरवपूर्ण उल्लेख दर्पण दिना निमित्त करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मरण करू आणि आगामी काळात देखील हे माध्यम दीपस्तंभासारखे सर्वांना मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा करूया.

 प्रशांत दैठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!