इराणमधील तणावपूर्ण स्थिती भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी

नवी दिल्ली –  इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  संघर्षामुळे  परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सद्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी अधिकृत  प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही बिगर-जरुरी (Non-essential) प्रवास टाळावा. जे भारतीय नागरिक कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी सध्या इराणमध्ये वास्तव्य करत आहेत, त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्या भागात हिंसक आंदोलने किंवा मोठी गर्दी जमली आहे, अशा ठिकाणांपासून भारतीयांनी लांब राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

भारत सरकारने इराणमधील भारतीयांना स्थानिक बातम्या आणि घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. जे भारतीय नागरिक निवासी व्हिसावर तिथे राहत आहेत आणि ज्यांनी अद्याप दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने आपली माहिती नोंदवावी, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे सोपे होईल.

इराणमध्ये गेल्या आठवडाभरात सरकारविरोधी आंदोलनांनी पेट घेतला असून, आंदोलक आणि सुरक्षा दलांमधील चकमकी वाढल्या आहेत. या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!