दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी पीडित बालिकेच्या आईने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, त्यांची अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असताना आरोपीने तिचा हात धरून तिला जवळच्या जुन्या घरात नेले व तिचा विनयभंग केला. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २/२०२६ नोंदवण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नायगावचे पोलीस निरीक्षक एस. एन. मारकड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड, अंमलदार साई सांगवीकर, बाबूराव चरकूलवार, बालाजी बामणे, बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर पुणेबोईनवाड यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली.
प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून अवघ्या २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीची गंभीर दखल घेत त्याला न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात नायगाव पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद असून, अशा गुन्ह्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा संदेश पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
