कंथक सूर्यतळ
६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी, सन १८३२ मध्ये पहिले मराठी वर्तमानपत्र ‘दर्पण’ प्रकाशित झाले. या ऐतिहासिक कार्यामागे होते बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारितेचे जनक. त्यांचा जन्म सन १८१२ मध्ये झाला, मात्र जन्मतारीख निश्चित नव्हती. म्हणून शासनस्तरावर सहा जानेवारी हाच त्यांचा जन्मदिन मान्य करण्यात आला आणि तोच दिवस आज दर्पण दिन म्हणून ओळखला जातो.
या दिवशी राज्यभर विविध कार्यक्रम होतात. अनेक अधिकारी आपल्या कार्यालयांत पत्रकारांना बोलावून त्यांचा सत्कार करतात. पण प्रश्न सत्काराचा नाही, प्रश्न व्यक्तीच्या सन्मानाचा नाही प्रश्न आहे लेखणीच्या सन्मानाचा. लेखणी कुठे वापरायची, कशी वापरायची, कोणासाठी वापरायची आणि कोणत्या हेतूने वापरायची याचं भान पत्रकाराकडे असायलाच हवं. पत्रकारिता ही वेळ, काळ आणि ठिकाण ओळखून करायची असते उत्साहात नाही, तर जबाबदारीतून.
बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकार नव्हते; ते रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इतिहास, भूगोल, जीवशास्त्र, गणित, भूविज्ञान, मानसशास्त्र अशा अनेक विषयांचे पारंगत होते. संस्कृत, हिंदी, बंगाली, गुजराती, तेलुगू, इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, पर्शियन अशा तब्बल अकरा भाषांचे ज्ञान त्यांना होते. त्यांनी सुरू केलेले दर्पण हे वर्तमानपत्र आठ वर्षे नियमित छापले गेले. पुढे १८४० मध्ये त्याचे साप्ताहिकात रूपांतर झाले. इंग्रजी राजवटीत असूनही ते वर्तमानपत्र मराठी व इंग्रजी—दोन्ही भाषांत प्रसिद्ध होत असे. हीच खरी पत्रकारितेची उंची होती.
मात्र प्रश्न असा आहे की, सहा जानेवारीला जो उत्साह, जो अभिमान आपण दाखवतो तो उरलेल्या ३६४ दिवसांत दिसतो का? दुर्दैवाने नाही. काही पत्रकार तर या दिवसाला स्वतःच “आमचा पोळा” म्हणत आपल्या पेशाची खिल्ली उडवतात. ज्या बैलांच्या मेहनतीवर आपलं अन्नधान्य उभं आहे, त्यांच्याशी स्वतःची तुलना करून आपणच आपली मानहानी करतो यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं?
या स्थितीला फक्त पत्रकारच नाहीत, तर समाजही जबाबदार आहे. समाजाला हवी तशी बातमी छापली की पत्रकार ‘चांगला’; प्रश्न विचारला, सत्य मांडलं की पत्रकार ‘वाईट’. आज राष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर पत्रकारिता विकली गेली आहे, हे नाकारता येत नाही. ऑपरेशन सिंदूरसारख्या गंभीर घटनांवेळी परदेशी माध्यमांनी वस्तुनिष्ठ बातम्या दिल्या, पण आपल्या देशात खोट्या, फुगवलेल्या, बनावट बातम्या पसरवल्या गेल्या पाकिस्तानवर ताबा, पाकिस्तानी पंतप्रधानांची अटक, कराचीवर हल्ला… हे सगळं खोटं होतं.
पत्रकाराचं काम केवळ बातमी देणं नाही सत्य छापणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि प्रश्न विचारत राहणं हे आहे. बातमी एका ओळीत संपत नाही; बातमीच्या मागे बातमी असते, बातमीच्या आतही बातमी असते. सत्यता पडताळणं आवश्यक आहे. कागदपत्रं नसली तरी माहितीची साखळी, घटनास्थळाची परिस्थिती, संदर्भ यांची जोड लावून बातमी उभी केली पाहिजे. संविधानाच्या कलम १९(१)(अ) मुळे मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे अधिकार आहे पण त्याचा गैरवापर नक्कीच कोणी पत्रकाराने करू नये.
प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेला एक वाक्य फार बोलकं आहे.
“पत्रकाराची लेखणी दुधारी लागू नये कोणाच्या जिव्हारी.”
या एका ओळीत पत्रकारितेचं संपूर्ण तत्त्वज्ञान दडलेलं आहे. जे चुकतात, ते ओरडतीलच त्याची चिंता करू नका. पण जर चूक तुमचीच असेल, तर त्या लेखणीला इतिहास कधीही माफ करणार नाही.
आज काही विदूषक हातात फलक घेऊन रस्त्यावर उभे राहतात आणि स्वतःला पत्रकार म्हणवतात. फलक म्हणजे पत्रकारिता नाही. पत्रकारितेला मुद्दे लागतात, प्रश्न लागतात, अभ्यास लागतो, उत्तरांचा शोध लागतो. अन्यथा पत्रकारितेचा विषय समाजात हास्यास्पद होतो आणि दुर्दैवाने आज तेच घडत आहे.
पैसाही महत्त्वाचा आहे तो सर्वांनाच हवा. पण तो कसा, कोणाकडून आणि कशासाठी घ्यायचा याचं भान पत्रकारालाच ठेवावं लागतं. नियतीचा नियम स्पष्ट आहे—जसं घ्याल, तसंच परत द्यावं लागतं. हे विसरू नका.आपल्या लेखणीने समाजाचं दुःख मांडता येईल, जनतेचा त्रास प्रशासनासमोर नेता येईल, प्रशासनाच्या चुका समाजासमोर उघड करता येतील—हीच खरी पत्रकारिता आहे. जर हे जमलं, तर पत्रकारितेचं नाव खाली नाही, तर उंचावेल. लोक वाचतील, विचार करतील आणि तो विचारच पत्रकाराचं खरं यश असतं.

दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा.
पण या शुभेच्छा फक्त एका दिवसापुरत्या नसाव्यात त्या ३६५ दिवसांच्या जबाबदारीत उतराव्यात, हीच अपेक्षा.
