लेक वाचवा लेक शिकवा अभियान; सर्व विद्यार्थ्यांना दिली माहिती
नांदेड – राज्यात बलात्कार, लहान मुलांवरील लैंगिक शोषण व अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा जवळा देशमुख येथे ‘गुड टच-बॅड टच’ मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगत स्वतःच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, प्राथमिक पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे, सहशिक्षक संतोष घटकार, मनिषा गच्चे, सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा गोडबोले, इंदिरा पांचाळ, सुलोचना गच्चे आदींची उपस्थिती होती.
राज्यभरात सर्व शिक्षकांना बाल लैंगिक शोषण संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आहे. सरकारी, खासगी अशा सर्वच शाळांमध्ये लैंगिकतेसंबंधी जागृती करणारा ‘गुड टच, बॅड टच’ उपक्रम राबविणे अनिवार्य केले आहे. शाळेतील सखी सावित्री समितीच्या वतीने लेक वाचवा- लेक शिकवा अभियानांतर्गत जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पदवीधर शिक्षिका संगिता बडवणे यांनी शरिराच्या अवयवांची माहिती, चुकीच्या व्यवहाराबद्दल, मुलांना नाही बोलण्याबद्दल, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ व सखी वन स्टॉप सेंटर १८१ बाबत माहिती दिली. सर्वच शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात यावा असे आवाहन मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी केले.
विद्यार्थ्यांना ही दिली माहिती
काही स्पर्शातून प्रेमाची भावना कळते. सुरक्षित वाटते. त्याला गुड टच असे म्हणतात. त्यांना गुड टच हे स्पर्शातून समजावून सांगा. जसे की, मिठी मारणे, मायेने गालावर किस करणे. त्यांना सांगा की जर एखाद्या व्यक्तीने हात पकडला आणि तुम्हाला चांगलं वाटलं तर तो व्यक्ती चांगला आहे. काही स्पर्श आपल्याला आवडत नाही. अनेकदा आपल्याला या स्पर्शामुळे अस्वस्थ वाटते. अशा वेळी त्याला बॅड टच असे म्हणतात, अशी माहिती देण्यात आली.
