काही दिवसांपूर्वी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. त्या लिलावात बांगलादेशचा डावखुरा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला ९.२ कोटी रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. टीमचा एक मालक शाहरुख खान आहे आणि इथूनच देशभक्तीचा अचानक उद्रेक झाला! शाहरुख खानला “गद्दार” ठरवण्याचा स्पर्धात्मक कार्यक्रम सुरू झाला.प्रश्न साधा आहे, बांगलादेशचा उत्कृष्ट खेळाडू विकत घेणे म्हणजे गद्दारी आहे का? हा खेळाडू कुणी रस्त्यावरून उचलून आणलेला नाही. तो आयसीसीच्या मान्यतेने आणि बीसीसीआयच्या परवानगीने लिलाव यादीत आला.
मग आयसीसी गद्दार आहे का?
बीसीसीआय गद्दार आहे का?
आयसीसीचे प्रमुख कोण?
बीसीसीआयचे नियम कोण बनवते?
जर बांगलादेशच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये घ्यायचेच नव्हते, तर नियम का बनवले नाहीत?

पण नाही,नियम, सरकार, व्यवस्था यांना प्रश्न विचारायचे नाहीत.
सोपं आहे. एक अभिनेता आहे, त्याचं नाव शाहरुख खान आहे, मग त्यालाच गद्दार ठरवायचं!उत्तर प्रदेशातील भाजपचे बाहुबली नेते संगीत सोम थेट धमकी देतात“केकेआरचं विमान लखनऊत उतरू देणार नाही.”वा! संविधान, कायदे, विमानतळ प्राधिकरण सगळं बाजूला. देश चालवायचा ठेका जणू एकट्याचाच!
काही बाबा, कथावाचक, तथाकथित धर्मरक्षक सुद्धा मैदानात उतरले.
कथेत ईश्वर सांगायचा असतो, माणसाला सद्मार्ग दाखवायचा असतो.
पण इथे कथा थांबते आणि “शाहरुख गद्दार आहे” याचाच जप सुरू होतो.

मग प्रश्न पडतो,पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणी विचारलं का की बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना भारतात आश्रय का दिला? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर बांगलादेशात जाऊन नेत्यांबरोबर फोटो काढतात, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी हस्तांदोलन करतात ते गद्दार नाहीत? गौतम अदाणी ओडिशात प्रकल्प उभारून बांगलादेशला वीज देतात ते गद्दार नाहीत? देशासाठी नियम वेगळे आणि शाहरुखसाठी वेगळे का?
केकेआरचा मालक एकटा शाहरुख नाही.
जुही चावला आणि तिचे पती जय मेहता हेही भागीदार आहेत. मग ते गद्दार नाहीत का? की गद्दारीचं प्रमाणपत्र फक्त नाव पाहून दिलं जातं? शाहरुख खानचे आजोबा सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेत होते. पण आज त्यांचा नातू देशद्रोही ठरतो!बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होतात, हत्या होतात त्यावर मात्र ना गळा फुटतो, ना सभा होतात, ना धमक्या दिल्या जातात.

खरा मुद्दा स्पष्ट आहे—
उत्तर प्रदेश निवडणुका जवळ येत आहेत.
पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा खेळ मांडायचा आहे.
त्यासाठी शाहरुख खान हा सोपा, सुरक्षित आणि कायमचा टार्गेट.
देशाच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्न विचारायची हिंमत नाही,
सरकारला जाब विचारायची ताकद नाही,
म्हणून गद्दारीचा ठपका कलाकारावर!
हा राष्ट्रवाद नाही ही निवडणुकीसाठीची सोयीची उन्मादाची स्क्रिप्ट आहे.
